मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

*राज्य शासनाने नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उडान योजनेअंतर्गत व्हायाबिलिटी गॅप

  फंडिंगची तरतुद करुन सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

*राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२५-२६ पासून “आदिशक्ती अभियान” राबविण्यात येणार

*जिल्ह्यात हर घर तिरंगा मोहिमेतून  राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे

*या वर्षाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होणा-या सर्व वारकरी भाविकांसाठी गुणवत्तापूर्वक सेवा सुविधा उपलब्ध केल्याने ही वारी शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख व्यवस्थापनाचा एक उत्कृष्ट नमुना ठरली आहे.

* आजपासून “स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर” उपक्रमाची घोषणा.

सोलापूर, दिनांक १५ (जिमाका):– ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामविकास विभागाने या वर्षापासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, राज्य राखीव दलाच्या समादेशक डॉ.दिपाली काळे, केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकुमार चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच स्वातंत्र्य सैनिक,  ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, सोलापूरच्या सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींच्या विमानसेवेच्या दीर्घकालीन मागणीला राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये “उडान” योजनेअंतर्गत  व्हायाबिलिटी गॅप फडिंगची तरतुद करुन सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय  सोलापूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि पर्यटन सेवा क्षेत्राला नवी दिशा देणारा आहे.

तसेच ग्रामविकास विभागाच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यात उमेद अंतर्गत 14 कोटी रुपये थेट महिला बचत गटांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन जिल्ह्यात मोठया प्रमाणावर लखपती दीदी  निर्माण होतील. श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी, अरण  तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी १५० कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे भव्य स्मारक उभारणीसाठी  शासनाची कृष्ण तलावाची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.

पंढरपूर शहरामध्ये आषाढी वारीच्या अनुषंगाने स्वच्छतेचे नवीन आयाम निश्चित केले. त्याच धर्तीवर स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हे अभियान आजपासून एक वर्षासाठी घोषीत करीत आहे. या अभियानामध्ये सर्व घटकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा. तसेच सोलापूर शहराच्या सन २०५७ पर्यंतच्या पाणी गरजांचा विचार करून महाराष्ट्र राज्य नगरोत्थान योजनेअंतर्गत ‘सोलापूर सिटी वॉटर सप्लाय स्कीमला’ शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. ह्या प्रकल्पातून सोलापूर शहरातील नागरिकांना सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण, संकलन आणि अंतिम विल्हेवाट सुनिश्चित केले जाणार आहे, असे पालकमंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “सर्वासाठी घरे” हे स्वप्न असून हे स्वप्न साकारण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रशासनाकडे विशेष पाठपुरावा करुन राज्यासाठी ऐतिहासिक 30 लक्ष घरे मंजूर  करून घेतली व यामध्ये सोलापूर जिल्हयाला 50 हजार घरकुले मंजूर आहेत.तसेच  सन 2025-26 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी एकूण 935 कोटी निधी मंजूर झाला असून  या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासकामे हाती घेण्यात येत असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन समिती कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सन २०२५-२६ पासून “आदिशक्ती अभियान” राबविण्यात येणार असून, महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्यांवर संवेदनशीलतेने उपाययोजना करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.  ग्रामस्तरीय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी “आदिशक्ती पुरस्कार” देऊन समित्यांचा गौरव केला जाणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन महिला सक्षमीकरणासाठी योगदान द्यावे असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

आजचा सोलापूर हा केवळ ऐतिहासिक नव्हे तर विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणारा जिल्हा आहे. शासनाच्या विविध योजनांमुळे जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल घडत असून सोलापूर जिल्हा हा भविष्यात महाराष्ट्रातील एक आदर्श जिल्हा म्हणून ओळखला जाईल. आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समरसतेसाठी आणि राष्ट्रहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा या स्वातंत्र्य दिनी आपण सर्वांनी एक संकल्प करण्याचे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांना अभिवादन केले. सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानी यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय  भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नसल्याचे सांगून सन 1930 मध्ये सोलापूर ने चार दिवस स्वातंत्र्य उपभोगले होते याची माहिती दिली. तसेच अनेक ज्ञात अज्ञात शूरवीरांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्याचे तेजस्वी प्रतीक असून हा इतिहास आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले सर्व स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार यांच्या सदिच्छा भेटी घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा  त्यांनी दिल्या. यावेळी सर्व उपस्थित नागरिकांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. यानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते विविध विभागांचे पुरस्कार वितरण संपन्न झाले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

000