वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील इमारतींचे व सदनिकांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

बीडीडीवासियांच्या घरांची स्वप्नपूर्ती

मुंबई, दि. १४ : वरळीतील बीडीडी चाळीत अनेक पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांसाठी आजचा दिवस विशेष ठरला. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झालेल्या दोन पुनर्वसन इमारतीतील सदनिकांच्या वाटप कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी इमारतीची व सदनिकेची पाहणी केली.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे खासदार मिलिंद देवरा, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री ॲड.आशिष शेलार, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृहनिर्माण व नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर आदी उपस्थित होते. भर पावसात बीडीडी वासियांनी उपस्थित राहून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे व श्री. पवार यांच्यासह सर्व मान्यवरांनी इमारतीच्या 40 व्या मजल्यावर जाऊन सदनिकेची पाहणी केली व कामाबद्दल समाधान व्यक्त केले. मुख्याधिकारी श्री. बोरीकर यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

००००

श्री.नंदकुमार वाघमारे/वि.सं.अ/