मुंबई, दि. १३ : जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. विकसित भारत सोबतच विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यात येत आहे. विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक असून यामध्ये कंपनी आपले योगदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
लोढा वर्ल्ड टॉवर येथील आयबीएम कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सामान्य प्रशासन (माहिती व तंत्रज्ञान) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन – नैनुटीया, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, आयबीएम कंपनीचे भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे महाव्यवस्थापक हान्स डेक्कर, व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल उपस्थित होते.
आयबीएम कंपनीने मुंबईमध्ये कार्यालय सुरू केल्याबाबत मुख्यमंत्री श्री.फडणवीस समाधान व्यक्त करीत म्हणाले, आयबीएम राज्य शासनासोबत कॉन्टम कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान यावर आधारित राज्याच्या विकासासाठी काम करेल. ‘कॉन्टम कम्प्युटिंग’ तंत्रज्ञानामुळे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल होत आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रभाव सर्वच क्षेत्रात वाढत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रही या तंत्रज्ञानाच्या सोबतीने प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होणार आहे. त्यामुळे आयबीएम सोबत राज्याच्या प्रगतीसाठी करण्यात आलेला सामंजस्य करार महत्त्वाचा आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कृषी क्षेत्रासमोर हवामान बदलामुळे मोठी आवाहने निर्माण झाली आहे. शाश्वत कृषीच्या विकासासाठी हे तंत्रज्ञान मोलाची भूमिका निभावणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी समोरील समस्या निकाली काढण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आयबीएम कंपनी आणि महाराष्ट्र शासन यांच्यात नाविन्यता, तंत्रज्ञान देवाण घेवाण बाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
००००
निलेश तायडे/विसंअ/