मुंबई, दि.११ : मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह आयोजित करण्यात येऊन नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. मुंबई शहर जिल्हा प्रशासनाने या सप्ताहात नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा पुरविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
महसूल दिन कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद करत प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी महसूल दिनाचे महत्त्व स्पष्ट करून महसूल प्रशासनातील विविध उपक्रमांची माहिती दिली.
महसूल सप्ताह (1 ते 7 ऑगस्ट) दरम्यान 2 ऑगस्ट रोजी ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ अभियान राबवून कार्यालयातील शाखांची स्वच्छता, दस्तऐवजांचे वर्गीकरण व व्यवस्थापन करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या विशेष उपक्रमांतर्गत माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांना आर्थिक मदत म्हणून धनादेश वितरित करण्यात आले.
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत 4 ऑगस्ट रोजी मुंबई शहरात उत्पन्न दाखले, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आयुष्मान कार्ड आदी सेवा देणारी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये प्राप्त अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली.
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी 5 ऑगस्ट रोजी शिबिर घेण्यात आले. 6 ऑगस्ट रोजी कफ परेड, कुलाबा येथे विशेष शिबिरासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
गौण खनिज विभागांतर्गत परवान्यांची तपासणी 7 ऑगस्ट रोजी ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. तसेच तृतिय पंथियांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
याचबरोबर दिनांक 1 ते 7 ऑगस्ट या महसूल सप्ताह कालावधीत राबविलेले शिबीरांद्वारे तसेच फिरते पथकाद्वारे उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्रांबाबत एकूण 2,074 अर्ज प्राप्त झाले असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आधारकार्ड, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना लाभ, मतदार नोंदणी व मतदार ओळखपत्र तसेच आरोग्य तपासणीसाठी लवकरच शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापुरे यांनी दिली आहे.
०००
बी.सी.झंवर/विसंअ