मुंबई, दि. ११ : केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर, मुफ्त बिजली योजनेतंर्गत राज्यातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पाची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी ‘मॉडेल शासकीय सोलार जिल्हा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिली.
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जा प्रकल्पाची अमंलबजावणी होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा विभागाने पुढाकार घेतला आहे. ज्या जिल्ह्यात जलद गतीने शासकीय इमारतींचे सौरीकरण करण्यात येईल, त्या जिल्ह्यास ‘मॉडेल शासकीय सोलार जिल्हा’ म्हणून घोषित केले जाईल. यासाठी स्पर्धा घेतली जाणार असून यात सहभाग घेण्यासाठी विहित नमुन्यातील पत्र संबंधित जिल्हाधिकारी व महाव्यवस्थापक (महाऊर्जा) यांना प्रमाणित करून पाठवावे लागणार आहे.
महाऊर्जामार्फत पत्रांची छाननी केल्यानंतर ज्या जिल्ह्यात सर्वाधिक सौरऊर्जा प्रकल्प स्थापित होतील, अशा जिल्ह्यांना मॉडेल शासकीय जिल्हा म्हणून जाहीर करण्यात येईल.
दि. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात येईल. प्रथम विजेत्यास पाच लाख रुपये, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. द्वितीय पारितोषिक ३ लाख तर तृतीय पारितोषिकासाठी १ लाख रुपये दिले जाणार आहेत. नागरी सेवा दिनी (२१ एप्रिल २०२६) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
या योजनेची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मंत्री सावे यांनी केले आहे.
०००
शैलजा पाटील/विसंअ/