उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन

बीड, दिनांक ०७ (जिमाका) :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व टाटा टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरात कौशल्यवर्धन केंद्र (CIIIT) प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशीलेचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याहस्ते आज झाले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सेवा सुविधा क्रमांक ३, बीड औद्योगिक क्षेत्र, बीड येथे Center For Invention, Innovation, Incubation and Training (CIIIT) कौशल्यवर्धन केंद्र जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी व औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासोबत विकसित करण्यात येत आहे. चार हजार चौरस मीटर जागेवर उभारल्या जाणाऱ्या या केंद्रात दरवर्षी ७ हजार विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना गुणवत्तापूर्ण नोकऱ्या, तांत्रिक अभ्यासक्रमांची आधुनिक जोड आणि उद्योगासाठी आवश्यक अभियंते, ऑपरेटर, तंत्रज्ञ याठिकाणीच  निर्माण होण्यास मदत होणार आहे.

या सोहळ्यास उद्योग मंत्री उदय सामंत, सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा, उपमुख्यमंत्र्यांचे     सचिव डॉ.राजेश देशमुख,जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र चिंचाणे आदींसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000