बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

बीड, दिनांक ७ (जिमाका) : जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत पत्रकार बांधवांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात श्री. पवार हे बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, विक्रम काळे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, बीड जिल्हा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि अध्यक्ष संतोष मानूरकर यांची उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, बीड शहरात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध दर्जेदार विकास कामे करुन बीड जिल्ह्याच्या वैभवात भर घालण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. विकास कामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष देण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. बीड जिल्ह्याचा विकास गतिमान करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असुन, महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारतीचे कामे दर्जेदार व्हावीत यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची जिल्ह्यात नियुक्ती केली आहे.

बीड शहरातील महत्वाच्या रस्त्याचे विस्तारीकरण करुन, रस्त्यांवर पसरलेले तारांचे जाळे कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यामुळे शहराचे सौंदर्यात भर पडणार आहेत. जिल्ह्याचा विकास करतांना  काही कठोर निर्णय देखील घ्यावे लागणार आहेत. यासाठी शहरातील नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन, बीड ते अहिल्यानगर ही रेल्वे सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. तसेच बीड जिल्हा पत्रकार संघाने केलेल्या सत्काराबद्दल समाधान व्यक्त करताना श्री. पवार म्हणाले की, पत्रकारांचा जिल्ह्याच्या विकासाकरीता नेहमीच महत्वाचे सहकार्य राहिले असुन, यापुढे ही असेच सहकार्य राहील अशी अपेक्षाही श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केली..

यावेळी बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.

००००