रायगड (जिमाका) दि.०७ :- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आज येथे केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई-गोवा महामार्गावरील कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले रायगड आणि रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. पनवेल येथील पळस्पे फाटा येथून या पाहणी दौऱ्यास सुरुवात झाली.
या पाहणी दौऱ्यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आम.रविद्र पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग एम.एन.राजभोज, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ कोकण भवन सुषमा गायकवाड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर आदि उपस्थित होते.
महाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते म्हणाले की, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, प्रवास करताना नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा सुरु असून नागरिकांना आवश्यक सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर राज्य शासनाकडून भर देण्यात येत असून महामार्गाचे काम दर्जेदार झाले पाहिजे आणि लवकर पूर्ण झाले पाहिजे यासाठी निश्चितच प्रयत्न केला जात आहे.
रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. इंदापूर व माणगाव बायपास पुलाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या कामासाठी नवीन ठेकदारांची नेमणूक करण्यात आली असून हे काम पूर्ण होण्याकरिता किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोकणात जाणारे पर्यायीमार्ग (खोपोली पाली) सुस्थितीत करावेत. इंदापूर, माणगाव येथे जास्तीचा पोलिस बंदोबस्त लावावा. होमगार्डची मदत घ्यावी. मुरुड,अलिबाग जाणाऱ्या नागरिकांसाठी वडखळ अलिबाग रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी. गणेशोत्सव हा कोकणातील लोकांचा जिव्हाळ्याचा विषय असून त्यांना प्रवासात कोणत्याही अडचणी येऊ नयेत संबंधित अधिकारी यांना दिलेल्या सूचनांचे पालन करावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर सुविधा केंद्र उभारुन त्या सुविधा केंद्रावर नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात.जिथे पुलांची कामे चालू आहेत तेथील सर्विस रोडवर वाहतुक सुरळीत राहतील यासाठी प्राधान्याने कामे पूर्ण करावीत. जिथे गरज आहे तिथे साईन बोर्ड, साईन व्हेजेस, रिफ्लेक्टर बसवावेत.
या पाहणी दौऱ्यात मंत्री श्री.भोसले यांनी पळस्पे, जिते पेण, पेण रेल्वे स्टेशन, वाशीनाका, गडब, खारपाले, कोलेटी या विविध ठिकाणी सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपारी सहाय्य करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या सद्य:स्थितीबाबतची माहिती संगणकीय सादरीकरण द्वारे उपस्थितांना दिली.
या पाहणी दौऱ्यावेळी उपविभागीय अधिकारी,तहसिलदार तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
००००