गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरु ठेवावी – मंत्री मंगलप्रभात लोढा

ग्रँट रोड येथील डी विभाग कार्यालयात जनता दरबार

Milind Kadam M4B
  •  जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार
  • जनता दरबाराला उदंड प्रतिसाद, म्हाडा संक्रमण शिबिराचा प्रश्नही लवकरच सोडवणार

मुंबई, दि. ०४: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त दर्शनासाठी येत असतात अशा वेळी गणेशभक्तांसाठी लोकल आणि मेट्रो रात्री उशीरापर्यंत सुरु ठेवण्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. महापालिकेच्या ग्रँट रोड येथील डी विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते.

Milind Kadam M4B

गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त मुंबई परिसरात दाखल होतात. यावेळी भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्र व्यवहार सुरु असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी जनता दरबारात दिली. प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती. त्यानुसार या जनता दरबाराचे आयोजन केल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

गेल्या महिनाभरात दक्षिण मुंबईत झालेल्या पाच जनता दरबारात ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळून सुमारे दोन हजार नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण महापालिका आणि रेल्वे सह बारा विभागांचे अधिकारी एकाच छताखाली आणण्यात आले. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे न मारता जागच्या जागी त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे शक्य झाले असल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

संक्रमण शिबिर झाल्याशिवाय रहिवाशांना घर रिकामे करण्याची नोटीस देऊ नये

जनता दरबारात अनेक नागरिकांनी म्हाडा संबंधित पुनर्विकास, दुरुस्ती आणि  संक्रमण शिबिर संदर्भात तक्रारी मांडल्या होत्या.अनेकदा नागरिकांना संक्रमण शिबिराची सोय न करता इमारती रिकाम्या करण्यासाठी सी टूच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. या संबंधित रहिवाशांची बाजू मंत्री लोढा यांनी ऐकून घेतली. यासंदर्भात म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असून संक्रमण शिबिर झाल्याशिवाय रहिवाशांना घर रिकामे करण्याची नोटीस देऊ नये,अशी सूचना करणार असल्याची माहिती मंत्री लोढा यांनी यावेळी दिली. तसेच, संक्रमण शिबिर तयार नसल्यास त्वरित इमारतीची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

०००

संध्या गरवारे/वि.सं.अ/