लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा -विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

  • उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
  • विभागीय आयुक्तालयात महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ

अमरावती, दि. ०२ : महसूल विभाग हा राज्य शासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. समाजातील सर्व घटकांशी महसूल विभागाचा संबंध येतो. महसूल विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळवून देण्यासाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने आपल्याला सोपविलेल्या कामाप्रती अत्यंत प्रामाणिक, नियमाधिन राहून सामान्यजनतेची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. त्यातूनच तुम्हाला समाजसेवा केल्याचा आत्मीक आनंद प्राप्त होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज येथे केले.

दि. 1 ते 7 ऑगस्ट, महसूल सप्ताह निमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी अपर आयुक्त अजय लहाने, रामदास सिध्दभट्टी, सुरज वाघमारे, यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, नगरविकास सह आयुक्त नितीन कापडनीस आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. सिंघल म्हणाल्या की, शासन व शासनाच्या कामकाजासंदर्भात नागरिकांमध्ये विश्वास वाढावा, महसूल विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा नागरिकांना वेळेत लाभ मिळावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमूख उपक्रम राबविण्याच्या हेतूने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताहाचे विभागात सर्वत्र आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात महसूल विभागाशी निगडीत जनसामान्यांची कामे पूर्ण केली जातील. महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महसूल विभागाकडून समाजाच्या विविध घटकांपर्यंत सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.

महसूल दिनाच्या शुभारंभप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येत आहे. ही संबधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची पावती असे सांगून पुरस्कारार्थींचे त्यांनी अभिनंदन केले. यापुढेही ज्यांना आज पुरस्कार मिळाला नाही, त्यांनी याचे शल्य न बाळगता आपल्याला सोपविलेले कार्य, जबाबदारी आणखी जोमाने करुन दिलेले लक्षांक पूर्ण करावे. पुढच्यावर्षी मी देखील पुरस्कार मिळविणारच, असा मनोदय बाळगावा. ई- गव्हर्नन्स, ई ऑफीस तसेच नवीनतम तंत्रज्ञानाचा आपले कार्यालयीन कामकाज सोपे करण्यासाठी नियमितपणे वापर करावा, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

सप्ताहाच्या पुढील दिवसांमध्ये २०११ पूर्वीपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र कुटुंबांना पट्टे वाटप, पाणंद आणि शिवार रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड, मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन, तसेच लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन डिबीटी प्रक्रिया पूर्ण करणे, हे महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवणे, शर्तभंग प्रकरणांबाबत निर्णय घेणे आणि शासनाच्या एम-सॅंड धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून महसूल सप्ताहाची सांगता करण्यात येईल. राज्य शासनाने महसूल प्रशासनातील पारदर्शकता वाढवून जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. यानुसार, विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे प्रत्येक दिवशी ठराविक विषयांवर विशेष मोहिमा राबवण्यात येणार आहेत, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

१ ऑगस्ट महसूल दिन साजरा करण्यामागचा मूळ उद्देश यासंदर्भात अपर आयुक् अजय लहाने यांनी प्रास्ताविक भाषणातून सविस्तर माहिती दिली.

राज्याचे प्रमुख उत्त्पन्नाचे साधन हे शेतसारा होते. शेरशहा सुरीपासून तर ब्रिटीश व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चौथाई, संरजामी व सरदेशमुखी पद्धतीने शेतसाऱ्याची वसूली आदीबाबत अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी माहिती देऊन महसूल विभागाचे महत्त्व त्यांनी विशद केले.

रामदास सिद्धभट्टी यांनी महसूल विभागात संचयन करण्यात येत असलेल्या माहितीचे पृथ्थकरण कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. धोरणे तयार करणसाठी तसेच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत माहितीचा उपयोग कसा होतो, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. प्रशासनामध्ये महसूल कर्मचाऱ्याची महत्त्वाची भूमिका असून लोकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण करण्यासाठी मानवतेचा स्पर्श बाळगावा, असे त्यांनी सांगितले. नवीनतम तंत्रज्ञानाचा उपयोग लोककल्याणसाठी करावा, असेही ते म्हणाले.

यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी लोकांना वेळेत आणि तत्परतेने महसूल विभागाच्या सेवा देण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा यासंबंधी मार्गदर्शन केले. ई- गव्हर्नन्स, ई ऑफीस, आपले सरकार पोर्टल, सेवाहक्क हमी कायदा आदी संदर्भा त्यांनी माहिती दिली.

यावेळी कार्यक्रमात भक्ती गीत गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली दुधे यांनी केले.

०००