महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा – पालकमंत्री संजय राठोड

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महसूल दिन उत्साहात साजरा; उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव

यवतमाळ, दि.२ (जिमाका): महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा असल्याचे गौरवोद्गार मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमात काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात पालकमंत्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिनानिमित्त महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. यावेळी प्र. जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, तहसिलदार राहुल मोरे, अधिक्षक आदित्य शेंडे आणि महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री राठोड म्हणाले, महसूल विभाग हा कर्तव्यनिष्ठ आणि सेवा देणारा विभाग आहे. ब्रिटिश काळापासून ते महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरही महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा राहिला आहे. राज्यावर येणाऱ्या सुख, दुःख आणि संकटकाळातही महसूल अधिकारी कर्मचारी नेहमी कार्यरत असतो. पूर्वीप्रमाणे आजही जनतेमध्ये महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा मानसन्मान कायम राहिला आहे. त्यांनी जनतेशी विश्वासाचे नाते संपादन केले आहे. समाजाचा समतोल राखण्याचे काम महसूल प्रशासन करतो. महसूल विभाग हा शासन आणि सामान्य जनतेमधील संवादाचा सेतू आहे. महसूल अधिकारी व कर्माचारी हा केवळ सरकारी सेवक नसून जनतेच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने जनहितासाठी नेहमी एकत्र येवून नव्या उमेदीने आणि नव्या दृष्टीकोणातून कामगिरी करावी आणि त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

प्र. जिल्हाधिकारी अनिल खंडागळे म्हणाले, महसूल दिन हा नवी चेतना निर्माण करणारा दिवस आहे. उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार हा एकप्रकारे प्रोत्साहन देणारा आहे. महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकभावनेने काम करावे. महसूल सप्ताहात प्रत्येक नागरिक, शेतकरी यांचे काम मार्गी लावावे, असे सांगून खंडागळे यांनी महसूल सप्ताहात होणाऱ्या उपक्रमांची माहिती विशद केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी महसूल सप्ताह हा तत्परतेचा आणि नागरिकांपर्यंत नागरी सेवा पोहचवण्याची संधी असलेला उपक्रम आहे. ‘सेवा ही सर्वश्रेष्ठ’ ही भावना ठेवून महसूल विभाग कार्यरत राहिल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्ती केली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव

१ ते ७ ऑगस्ट दरम्यान राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या महसूल दिन व महसूल सप्ताहात जिल्हा प्रशासनातील उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुषंगाने पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते उत्कृष्ट अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी गोपाळ देशपांडे, उत्कृष्ट तहसिलदार राहुल मोरे, उत्कृष्ट नायब तहसिलदार महेश रामगुंडे, उत्कृष्ट सहायक महसूल अधिकारी प्रदिप पाचपोळ, उत्कृष्ट मंडळ अधिकारी जयानंद, उत्कृष्ट महसूल सहायक सचिन बागडे, उत्कृष्ट लघुलेखक विद्या गोमासे, उत्कृष्ट ग्राम महसूल अधिकारी वैभव सुर्यवंशी, उत्कृष्ट वाहनचालक नितीन ठाकरे, उत्कृष्ट शिपाई नंदाबाई मडावी, उत्कृष्ट पोलीस पाटील शीतल गावंडे, उत्कृष्ट कोतवाल नंदु गेडाम आणि उत्कृष्ट ग्राम विकास अधिकारी कामराज चौधरी यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून गुणगौरव करण्यात आला.

प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी केले. तर आभार प्रेरणा अभ्यंकर यांनी मानले.

०००