मुंबई, दि. ०१ : महसूल विभाग हा शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणारा महत्त्वाचा विभाग आहे. सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्राच्या राजधानीत काम करण्याच्या मिळालेल्या संधीचा उपयोग करावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले.
महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गोयल यांच्या हस्ते विविध योजनांचे लाभार्थी तसेच उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कमी मनुष्यबळ असतानाही उत्कृष्ट कार्य केलेल्या विभागांच्या कामाचे कौतुक केले. अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.शिवनंदा लंगडापुरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या, विविध योजनांचा लाभ मिळवून देणारा विभाग म्हणून महसूल विभागाकडून नागरिकांच्या तसेच लोकाभिमूख, पारदर्शक प्रशासनासाठी राज्य शासनाच्या देखील मोठ्या अपेक्षा आहेत. मुंबई शहर जिल्हा आकाराने लहान असला तरीही राजधानीचे शहर म्हणून याचे महत्त्व मोठे आहे. मालमत्ता पत्रांचे (प्रॉपर्टी कार्ड) वितरण, वसुली यांसह विविध विभागांमध्ये जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य झाल्याबद्दल कौतुक करुन त्यांनी तत्परतेने सुरू असलेले काम आत्मविश्वासाने आणि याच ऊर्जेने यापुढेही सुरू राहील आणि शासनाने दिलेली विविध उद्दिष्टे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे काम उत्कृष्ट असल्याचे नमूद करुन प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत चांगली सेवा देऊन सर्वसामान्यांमध्ये विभागाची प्रतिमा अधिक चांगली होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.लंगडापुरे यांनी महसूल दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट करुन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांबाबत माहिती दिली. वसुली विभाग, अधीक्षक भूमि अभिलेख, मालमत्ता पत्रांचे वितरण, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभासह विविध दाखल्यांचे वितरण आदी क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय कामाबाबत त्यांनी या विभागांतील कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली.
यावेळी विभागीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी कटकधोंड यांच्यासह विविध संवर्गात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग, तृतीयपंथी आदी योजनांच्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
०००
बी.सी.झंवर/विसंअ