सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) शहराचे नामांतर “ईश्वरपूर” करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणार – संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. १८ : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, (ता. वाळवा) या शहराचे नाव बदलून “ईश्वरपूर” करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. जनभावना लक्षात घेता इस्लामपूर (ता. वाळवा) या शहराचे नाव “ईश्वरपूर” असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे निवेदन संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत केले.
श्री. पाटील यांनी निवेदनात म्हटले की, गाव किंवा शहर यांचे नाव बदलण्याबाबतचा विषय हा केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून, याप्रकरणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता होत असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास शिफारसीसह सादर करण्यात येत आहे. केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर इस्लामपूर शहराचे नामांतर “ईश्वरपूर” असे करण्यात येईल.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/
दिव्यांगांसाठीच्या अनुदानात १००० रुपयांची वाढ मंत्री अतुल सावे यांचे विधान परिषदेत निवेदन
मुंबई, दि. १८ : इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधान परिषदेत महत्त्वाचे निवेदन करत राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दरमहा २५०० रुपये अनुदान देण्याचे घोषित केले.
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या दरमहा 1,500 रुपये अनुदानात आता थेट 1000 रुपयांची वाढ करून ते 2,500 रुपये करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रवण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये इतके अर्थसहाय्य मिळणार आहे.
000
संजय ओरके/विसंअ/