परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ‘एमआयडीसी’ची चार देशात केंद्र उभारणार – उद्योगमंत्री उदय सामंत
- महाराष्ट्रात टेस्लाचे पहिले शोरूम
मुंबई, दि. १८ : देशातील टेस्लाचे पहिले शोरुम मुंबईमध्ये सुरू झाले आहे, महाराष्ट्र उद्योग स्नेही असल्याचीही पावती आहे. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर आणखी परकीय गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने चार देशांमध्ये ‘एम आय डी सी’ ची केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
मुंबईतील बीकेसी येथे सुरू झालेले टेस्ला शोरूम महाराष्ट्रासाठी मोठा गौरव असल्याचे सांगून उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, या उपक्रमामुळे जागतिक दर्जाच्या वाहन उत्पादन क्षेत्रात राज्याचे स्थान अधिक भक्कम होणार आहे. आगामी काळात टेस्लाची वाहने महाराष्ट्रातच बनविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
हापूस आंब्याला मिळालेले ‘जीआय’ गोल्ड मेडल हे देखील राज्यासाठी गौरवास्पद ठरले आहे. रत्नागिरीच्या हापूस आंब्याला मिळालेल्या या मान्यतेमुळे राज्यातील शेती आणि फळउत्पादन क्षेत्राला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, रोजगार निर्मितीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, विश्वकर्मा योजना आणि मधाचे गाव यांसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील युवकांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तसेच मनोरंजन क्षेत्रातही महाराष्ट्र पुढाकार घेत असून, मुंबईमध्ये वेव्हज समिट आयोजित करण्यात आले. राज्यातील मनोरंजन व्यवसायांना उद्योगाचा दर्जा देण्यासाठी उद्योग विभाग सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.
००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/
कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न – कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. १८ : राज्यातील ५ लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य करण्याची योजना शासनाने तयार केली असून यासाठी पहिल्या टप्प्यात १ लाख उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली. नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना श्री. लोढा बोलत होते.
महाराष्ट्रात सर्वात जास्त स्टार्टअप असल्याचे सांगून कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, या स्टार्टअपना प्रोत्साहन देणे व त्यांचा व्यवसाय दीर्घकाळ चालण्याच्या दृष्टीने त्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचे धोरण ठरवण्यात येत आहे. ‘आय टी आय’ मध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक, गोसेवा अशा स्वरूपाचे कोर्स सुरू करण्यात आल्याचेही श्री. लोढा यांनी सांगितले.
००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/
सागरी सुरक्षा उपाय आणि अवैध धंद्यांवरील कारवाई मुळे राज्यात सागरी मत्स्योत्पादनात तीन हजार मेट्रिकटन वाढ – मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे
मुंबई, दि. १८ :- राज्याच्या सागरी सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाय योजना आणि सागरी किनाऱ्यावरील अवैध धंद्यांवर करण्यात आलेली कारवाई यामुळे राज्यातील सागरी मत्स्योत्पादनामध्ये तीन हजार मेट्रिक टन वाढ झाल्याची माहिती मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेत दिली. नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावास उत्तर देताना मंत्री राणे बोलत होते.
सागरी सुरक्षा आणि मत्स्योत्पादन वाढ या दोन गोष्टीवर शासन लक्ष केंद्रित करून काम करत असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, गस्ती नौकांच्या माध्यमातून १ हजार १६५, ड्रोनच्या माध्यमातून १ हजार ८०३, आणि पावसाळी मासेमारी उल्लंघन प्रकरणी ३६ याप्रमाणे गेल्या आठ महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. मासेमारीला १०० टक्के कृषी दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. मिरकर वाडा, रत्नागिरी येथे २२ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येत आहेत. कोकणातील प्रवास सोपा व्हावा यासाठी ‘एम टू एम’ रो रो सर्व्हिस येत्या १५ दिवसात सुरू करण्यात येत आहे. तारापूर मत्स्यालयासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून जागतिक दर्जाचे मत्स्यालय तयार करण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असून वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून ‘आय टी आय’ मध्ये या विषयी कोर्स सुरू करण्यात येत असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.
००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/
सहकार क्षेत्राला भक्कम करण्यासाठी शासन कटीबद्ध – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई, दि. १८ : राज्यातील सहकार चळवळ भक्कम पायावर उभी रहावी आणि त्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम व्हावी यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले. २६० च्या प्रस्तावाला उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते.
प्रत्येक जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँका या ग्रामीण व कृषी वित्त पुरवठ्याचे आधारस्तंभ असल्याचे सांगून सहकार मंत्री पाटील म्हणाले की, अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी शासनाने ७६९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ‘लाडक्या बहिणीं’साठी सहकारी संस्था स्थापण्यास मान्यता दिली आहे. शासकीय ठेवी जिल्हा सहकारी बँकेत ठेवण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यातील यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसाठी वेगळी जिल्हा बँक स्थापण्यासाठी अहवाल मागवण्यात आला आहे. राज्यात नव्याने ५४ गोदामे बांधण्यात आली असून आणखी २५ गोदामे बांधण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/