कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाची कामे करण्यात येणार – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. १८ : कराडजवळील कृष्णा कालव्याच्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी अस्तरीकरणाचे काम सुरू केले जात असल्याची माहिती जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
विधानपरिषदेत कृष्णा कालव्याच्या पाण्याची गळती थांबवून वहन क्षमता वाढविण्यासंदर्भात सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना श्री. विखे पाटील बोलत होते.
जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, कालव्याच्या पडझड झालेल्या भागांची दुरुस्ती आणि अस्तरीकरणाची विशेष दुरुस्ती कामे प्रगतीपथावर आहेत. कृष्णा कालव्याद्वारे 1350 हेक्टर जमिन ओलिताखाली आणण्यासाठी कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येणार असून यासंदर्भातील कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी होणार – कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. १८ : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामध्ये साहित्य खरेदीमध्ये १०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य दादाराव केचे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. लोढा बोलत होते. यावेळी सदस्य अभिजित वंजारी यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
कौशल्य विकास मंत्री लोढा म्हणाले की, यापूर्वी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन वेळा समिती स्थापन करण्यात आली होती. नंतर लोकायुक्तांकडे गेले. त्यांनी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत याची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले.
००००
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/
‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सविस्तर इतिहासाच्या समावेशासाठी केंद्र शासनाकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. १८ : ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास अधिक सविस्तर, अभ्यासपूर्ण असावा यासाठी केंद्र शासनाकडे राज्याचे शिष्टमंडळ घेऊन पाठपुरावा करण्यात येईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेत प्रश्न विचारला होता. त्यावेळी श्री भोयर यांनी उत्तर दिले.
शालेय शिक्षण मंत्री डॉ. भोयर म्हणाले की, ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास अपुरा आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री यांनी केंद्रीय मंत्री यांना भेटून सविस्तर व अभ्यासपूर्ण इतिहासाचा समावेश करण्याची विनंती केली आहे. पुढील काळात यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येऊन आवश्यक वाटल्यास केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ घेऊन जाण्यात येईल. तसेच नवीन शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम तयार करताना राज्याचा इतिहास व भूगोल यासंदर्भात सविस्तर माहिती असावी याची काळजी घेतली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत सदस्य सत्यजित तांबे, भावना गवळी, अमित गोरखे यांनी सहभाग घेतला.
0000
नंदकुमार वाघमारे/विसंअ/