सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

'एनएडीपी'त दीक्षान्त समारंभ उत्साहात

  • देशाच्या स्वावलंबन व सामरिक सज्जतेच्या वाटचालीत विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे

नागपूर, दि. १२ : भारत आज जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारा देश म्हणून पुढे येत आहे. विशेषतः संरक्षण क्षेत्रात देशाची वाटचाल स्वावलंबनाकडे सुरू आहे. स्वावलंबन व सामरिक सज्जतेकडे वाटचाल करत असलेल्या देशाच्या प्रवासात ‘एनएडीपी’तून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी योगदान देत सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री अंगीकारावी, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमीत पदव्युत्तर व्यवस्थापन पदविकेच्या (PGDM) पहिल्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. यावेळी मा. राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड संजय हजारी, मुख्य संचालक, राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी डॉ. जे. पी. दास, संचालक (मानव संसाधन), म्युनिशन्स इंडिया लिमिटेड जे. पी. नाईक यांच्यासह संरक्षण क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमीमध्ये व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका (PGDM) च्या पहिल्या बॅचच्या दीक्षान्त समारंभाला उपस्थित असल्याचा आनंद असल्याचे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले की, केवळ पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर आपल्या संपूर्ण राष्ट्रासाठी ही एक मैलाचा दगड ठरणारी घटना आहे.  देशाच्या संरक्षण क्षेत्रातील परिवर्तनाच्या प्रवासात या अकादमीतून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. ही अकादमी भविष्यात भारतातील संरक्षण उत्पादन व्यवस्थापन क्षेत्रातील एक उत्कृष्ट विद्यार्थी केंद्र बनणार असून त्याचा पाया आज घातला गेला असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.

राज्यपाल पुढे म्हणाले की, संरक्षण साधने विदेशातून आयात करावी लागायची. परदेशावर अवलंबून राहावे लागायचे. आता मात्र संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनासह संशोधन व आधुनिकीकरण पाहायला मिळत आहे.

सध्याचे युद्ध हे मनुष्यापुरते मर्यादित राहणार नसून तंत्रज्ञानावर आधारित राहणार आहे. तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता आपल्याला उच्च दर्जाचे संरक्षण तंत्रज्ञान गरजेचे आहे. या अकादमीच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान अवगत होणार आहे. संरक्षण क्षेत्र हे आता सर्वांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे पुढे जाण्याच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्याचे असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.

विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

एनएडीपीतून पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात आली. या सर्वच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी संरक्षण क्षेत्रातील विविध कंपन्या, संस्थांमध्ये उपलब्ध झाली आहे. विशेषतः संरक्षण क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम एनएडीपी मार्फत राबविण्यात येतो.

०००