- उपक्रमाद्वारे खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
- ‘शासन आपल्या मोबाईल’वर उपक्रमास प्रतिसाद
- जिल्हाधिकारी विकास मीना यांची संकल्पना
यवतमाळ, दि.१९ (जिमाका) : विविध शासकीय योजना, उपक्रम, कायद्यांची माहिती नागरिकांना सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या मोबाईलवर’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात कृषी विभागाचा समावेश करण्यात आला असून येत्या खरीप हंगामाबाबत उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
महसूल भवन येथे उद्घाटनप्रसंगी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे उपस्थित होते. उपक्रमांतर्गत प्रशासनाच्यावतीने ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या नावाने यु-ट्यूब चॅनल तयार करण्यात आले आहे.
या चॅनेलवर महसूल विभागाशी संबंधित जमिनीची नोंदणी, फेरफार नोंदी, अकृषक परवानगी, विविध दाखले, वनहक्क कायदा, रस्ते संबंधी वाद, शिधापत्रिका, जमीन प्रकार, सातबारा, वारस नोंदी, भूसंपादन प्रक्रिया, मतदार नोंदणी प्रक्रिया, कलम 155 दुरुस्ती पद्धत, अतिक्रमन नियमित करणे, नैसर्गिक आपत्ती, जन्म मृत्यूची उशिरा नोंदणी, शेती घेतांना घ्यावयाची दक्षता, सहधारकांमध्ये हिस्से वाटप, अर्धन्यायिक प्रक्रिया, सामाजिक अर्थसहाय्य योजना, पोटखराब जमीन वापरात आणणे, गौणखनिज संदर्भात माहिती, अदिवासी जमिनींचे व्यवहार अशा विविध विषयांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे या हंगामाच्यादृष्टीने महत्वाचे विषय चॅनेलवर देण्यात आले आहे. तज्ञ अधिकारी, कर्मचारी यांनी माती परिक्षण, पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया, बियाणे खरेदी करतांना घ्यावयाची काळजी, सोयाबीणची उगवणक्षमता चाचणी, सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड, सोयाबीन लागवडीचे अष्टसुत्रे, हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन, फळबाग लागवड योजना आदी विविध विषयांची माहिती देण्यात आली आहे. पुढील टप्प्यात विविध शासकीय विभागाच्या योजना देखील उपलब्ध होणार आहे.
शेतीशी संबंधित विषय प्राधान्याने घ्यावे – पालकमंत्री
राज्य व केंद्र शासन सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविते. या योजनांची माहिती नसल्याने लाभ घेण्यासाठी ते पुढे येत नाही. त्यामुळे कृषीसह विविध विषयांचे छोटे छोटे आणि सोप्या भाषेत माहिती देणारे व्हिडीओ तयार करून प्रसारीत करावे, असे उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले. हा अतिशय चांगला उपक्रम असून जिल्ह्यातील नागरिकांना याचा फायदा होईल, असे सांगितले.
45 हजारावर नागरिकांनी घेतला उपक्रमाचा लाभ
शासन आपल्या मोबाईवर हा उपक्रम कमी कालावधीत अतिशय लोकप्रिय ठरला आहे. उपक्रमाच्या चॅनेलवर महसूल विभागाचे महत्वपूर्ण विषयांचे 24 व्हिडीओ प्रसारीत करण्यात आले होते. आता कृषी विभागाच्या 9 व्हिडीओची त्यात भर पडली आहे. कमी कालावधीत जिल्हा व जिल्ह्याबाहेरील 45 हजारावर नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला आहे.
000