केळीच्या कल्स्टर डेव्हलपमेंटसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. १५ : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेती शाळा असे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवा. केळी संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाच्या कल्स्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. केळी उत्पादक जमिनींची सुपिकता कायम रहावी, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात केळी संशोधन, तंत्रज्ञान प्रसार केंद्र व केळी विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत मंत्रालय येथे बैठक घेण्यात आली. यावेळी कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, आमदार अमोल जावळे, फलोत्पादन संचालक डॉ. के. पी. मोते, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, उद्यानवेत्ता केळी संशोधन केंद्राचे डॉ. अरुण भोसले उपस्थित होते.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी आयुक्तालयाने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी आवश्यक अशा सर्व उपाययोजना करण्यासाठी नियोजन करावे. केळी पिकांवर येणाऱ्या रोगाबाबत शेतकऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, कोणती औषधे वापरावीत याची माहिती शेतकऱ्यांना पोहोचवावी. तसेच शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण संशोधन व त्याची माहिती प्रभावीपणे पोहाचवून केळी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. केळीची रोपे लावणे ते निर्यातीपर्यंत शेतकऱ्यांना माहिती पोहोचवावी. केळीच्या कल्स्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमाला अधिक बळकट करण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना व निधीची तरतूद वाढवावी, असे मंत्री ॲड. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

आमदार अमोल जावळे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि उपाययोजना विषयक चर्चा केली.

०००

संध्या गरवारे/विसंअ/