नाशिक, दि. 8 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा): महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे एआय संकल्पनेवर साकारलेल्या अंगणवाडी केंद्राच्या नूतन इमारतीस भेट दिली व अंगणवाडीतील बालकांचे कौतुक केले.
यावेळी महिला व बालविकास आयुक्तालय,पुणे च्या आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रतापराव पाटील, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कव्हळे, दिंडोरीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, वनारवाडीचे सरपंच दत्तू मेरे, अंगणवाडी शिक्षिका ललिता देशमुख, मदतनीस लीलाबाई गुंबाडे यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मुले उपस्थित होते.
महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे यांनी गुरूकुल व चिकू टेक्नॉलॉजी अंगणवाडी मॉडेच्या माध्यमातून शरद अहिरे यांनी साकारलेल्या डिजिटल अंगणवाडी केंद्रास भेट देवून पाहणी केली. एआय संकल्पनेतून तयार झालेल्या या अंगणवाडीत मुलांचा बालवयातच शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आलेले आहे. यात मराठी व इंग्रजी मुळाक्षरे, संख्याज्ञान, प्राणी, पक्षी, फळे, भाज्या यांचे आकार व नाव ओळख यासह मुलांची तर्कशक्ती व कार्यक्षमता विकसित होण्यासाठी बौद्धिक खेळ, कोडी, खेळणी हे सर्व शैक्षणिक साहित्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरातून तयार केले असून एक वर्षाचा अभ्यासक्रमाचा कार्यक्रम तयार केलेला आहे.
या अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांना बालवयातच आधुनिक शिक्षण मिळेल तसेच भविष्यातील आव्हानांना ते आत्मविश्वासाने सामोरी जातील असे सांगत श्री. अहिरे यांनी अंगणवाडीतील साहित्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते अंगणवाडी केंद्रात सहा महिन्याच्या बालकास अन्नप्राशन करण्यात आले. यावेळी बालकाचे पालक व गावातील महिलाही उपस्थित होत्या.