ओटीटी क्रांती; वैयक्तिकरण, तंत्रज्ञान आणि कथांवर स्ट्रीमिंगचे भविष्य

नेटफ्लिक्स, सोनी, जिओ हॉटस्टारचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञांचे मत

मुंबई, दि. ०३: ओटीटी विश्वात तंत्रज्ञान, वैयक्तिकरण आणि सर्जनशीलता यांचा संगम आता प्रेक्षकांच्या सवयी आणि पसंती बदलतो आहे, असे मत वेव्हज्‌ परिषदेत सहभागी झालेल्या आघाडीच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद – २०२५ मध्ये ‘ओटीटी रिव्होल्युशन: हाऊ एआय, पर्सनलायझेशन अँड इंट्रॅक्टिव कंटेंट अ चेंजिंग स्ट्रीमिंग लॅन्डस्केप’  या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी लायनस्गेट प्ले एशियाचे अध्यक्ष रोहित जैन यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या या चर्चेत जिओ हॉटस्टारचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर भरत राम, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी, नेटफ्लिएक्स इंडियाचे उपाध्यक्ष (कन्टेन्ट) मोनिका शेरगिल, एशिया पॅसिफिक आणि मिनी प्राइम व्हिडिओचे उपाध्यक्ष गौरव गांधी, हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट लिमिटचे व्यवस्थापकीय संचालक नीरज रॉय यांनी सहभाग घेतला.

प्रेक्षकासाठी योग्य कंटेंट

गौरव बॅनर्जी यांनी सांगितले की, ग्राहक काय पाहतो, काय शोधतो, त्याच्या आवडीवरुनच आम्ही पुढील कंटेंट सुचवतो. प्राईम व्हिडिओ, मिनी टीव्ही यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर ग्राहकांचा प्रवास एकसंध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. भाषेच्या विविधतेतून प्रेक्षकांची रुची वाढवण्यासाठी सबटायटल्स, डब्स महत्त्वाच्या ठरतात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेटफ्लिक्सचार आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यावर भर

नेटफ्लिक्सवरील प्रत्येक वापरकर्त्याचा अनुभव वेगळा असतो, कारण आमचे उत्पादन सतत प्रेक्षकांच्या वर्तनावर अवलंबून असते. वैयक्तिकीकरण आणि कंटेंट डिस्कवरी यामध्ये समतोल राखत, नवीन शैली आणि ट्रेंड्स प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे काम अल्गोरिदम करत असते. हे एक सर्जनशील माध्यम आहे, असे मत नेटफ्लिक्सच्या कंटेंट उपाध्यक्षा मोनिका शेरगिल यांनी मांडले.

जिओ हॉटस्टारचा अनोखा ‘क्रिकेट टू कंटेंट’ फॉर्म्युला

जिओहॉटस्टारचे भरत राम यांनी आयपीएलसारख्या मोठ्या इव्हेंटनंतर प्रेक्षकांना इतर कंटेंटकडे वळवण्याची रणनीती मांडली. जर कोणी तमिळ कमेंट्री निवडली, तर त्याच्या होमपेजवर तमिळ कंटेंट जास्त दिसते, असे त्यांनी सांगितले. वापरकर्त्याचे डिवाइस, भाषा आणि लोकेशन यावरून वैयक्तिक शिफारसी केल्या जातात. यामागे प्रेक्षक वर्षभर टिकून राहावा, हेच अंतिम उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोनीचा भर कथांवर

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी यांनी सांगितले की, वैयक्तिकरणाबरोबरच कथांवर आपला सहज विश्वास बसतो. आपण कथा सांगणाऱ्या संस्कृतीतून आलो आहोत. ज्या भाषा, वेळ आणि प्रदेश यांच्या सीमा पार करतात. पुष्पा -२ आणि छावा सारख्या यशस्वी चित्रपटांचा दाखला देत, त्यांनी हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरवून बनवत नाहीत, ती वेळ, भावना आणि सर्जनशील दृष्टी ठरवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नव्या ओटीटी पर्वाची सुरुवात

या चर्चेतून स्पष्ट झाले की, ओटीटी क्षेत्र आता केवळ कंटेंट तयार करणारे राहिलेले नाही, तर एक स्मार्ट, गुंतवणूक करणारे, आणि सांस्कृतिकदृष्ट्या सजग माध्यम बनले आहे. वैयक्तिक अनुभव, भाषिक विविधता आणि कथांची सार्वत्रिक शक्ती हाच या नव्या ओटीटी पर्वाचा मूलमंत्र ठरत आहेत.

०००

गजानन पाटील/ससं/