- कोविडनंतर चित्रपट पाहण्यातील बदलते कल अनुपम खेर यांनी केले अधोरेखित
- ज्यावेळी आपली परस्पर सामायिक संस्कृती, गाणी, कथा, माती याचा आदर करता, त्यावेळी तो चित्रपट बनतो ‘भारतीय’: खुशबू सुंदर
मुंबई, दि. ०२ : मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे सुरू असलेल्या सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत (WAVES 2025) आज अखिल भारतीय चित्रपट : दंतकथा आथवा चालना असलेले वास्तव (Pan-Indian Cinema: Myth or Momentum) या विषयावर निमंत्रितांचे प्रेरणादायी चर्चासत्र झाले. नमन रामचंद्रन यांनी या सत्राचे सूत्रसंचालक म्हणून भूमिका पार पाडली. यासोबतच नागार्जुन, अनुपम खेर, कार्ती आणि खुशबू सुंदर असे भारतीय चित्रपट उद्योग क्षेत्रातील चार मान्यवर या चर्चासत्रात सहभागी झाले. या सर्वांनी उपस्थितांना गुंतवून ठेवणारा संवाद साधला.
चित्रपटाची ताकद ही त्यातल्या भावनिक संदर्भांशी जोडलेली असते याचे स्मरण खुशबू सुंदर यांनी श्रोत्यांना करून दिले. भारतातील चित्रपट हे सर्व भारतीयांना आपलेसे वाटावेत, अशा उद्देशानेच तयार केले जातात, त्यामुळेच बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपट उद्योगक्षेत्रात कोणताही भेदभाव केला जाऊ नये, ही बाब त्यांनी ठामपणे अधोरेखित केली. ज्यावेळी तुम्ही आपल्या परस्पर सामायिक संस्कृती, आपली गाणी, आपल्या कथा, आपल्या मातीचा आदर करतात, त्यावेळी तो चित्रपट प्रादेशिक किंवा राष्ट्रीय न राहता ‘भारतीय’ चित्रपट बनतो. यातूनच सर्व गोष्टींचे मूळ एकाच ठिकाणी असल्याचीही जाणिव आपल्याला होते, असे निरीक्षणही त्यांनी मांडले.
नागार्जुन यांनीही अशीच भावना व्यक्त केली. त्यांनी आपल्या मनोगत आणि विचारांतून भारतातील चित्रपट निर्मितीच्या परंपरांना एकत्र जोडणाऱ्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा गौरव केला. कथात्मक मांडणीच्या क्षेत्रातील कलाकारांना प्रेरणा देणाऱ्या असंख्य भाषा, चालीरीती आणि भूप्रदेशांबद्दलची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. आपल्या मूळ जे आहे, त्याचा अभिमान बाळगल्याने सर्जनशीलतेला कुठेही मर्यादा येत नाहीत, तर त्याउलट यामुळे सर्जनशीलता अधिक मुक्त होत असते, याचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले. हेच भारतीय चित्रपटांचे खरे सार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
अनुपम खेर यांनी कोविड-19 साथीमुळे सिनेमा पाहण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलाबद्दल सांगितले. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी वेगवेगळे स्रोत वापरू लागले, विविध प्रदेशांमधील नव्हे, तर केवळ भारतातील चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढल्याचे ते म्हणाले. आपल्या कलेच्या सादरीकरणात प्रामाणिकपणा असणे गरजेचे आहे यावर त्यांनी भर दिला. ‘तुम्ही एखाद्या पौराणिक कथेचे मोठ्या पडद्यावर प्रसारण करत असाल किंवा एखादे नाटक दाखवत असाल, तरी कथाकथनातील प्रामाणिकपणाची कधीच तुम्ही साथ सोडता कामा नाही. प्रेक्षकांना नाट्यमयता आवडते, तरीही कथाकथनातील सच्चेपणाला ते नेहमीच दाद देतात आणि चित्रपटात हीच गोष्ट सर्वात प्रभावी ठरते,’ असे ते म्हणाले.
याच मुद्द्यावर कार्ती म्हणाले की, प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभवाचे नेहमीच आकर्षण असते. प्रेक्षकांना आज वैविध्यपूर्ण आशय सहज उपलब्ध असूनही, गाणी, नृत्याची जादू, आणि शौर्यगाथा पाहण्यासाठी ते आजही चित्रपटगृहात गर्दी करतात.
या चर्चासत्रात सहभागी झालेल्या वक्त्यांनी ‘प्रादेशिक’ चित्रपटांच्या कल्पने पलीकडे जाऊन ‘भारतीय चित्रपट’ ही संकल्पना आत्मसात करण्याचे महत्त्व विषद केले. भावना आणि प्रामाणिकपणाचे महत्व अधोरेखित करून, भारतीय सिनेमाची खरी ताकद विभाजनात नसून, आपल्या मातीत रुजलेल्या एकतेत आहे, आणि हाच वेग भारतीय सिनेमाला पुढे घेऊन जाईल, असे अधोरेखित केले.