- भारत आशय निर्मितीत अभूतपूर्व वाढ अनुभवत आहे – इंस्टाग्राम प्रमुख अॅडम मोसेरी
- वेव्हज् २०२५ मध्ये अनौपचारिक संभाषणात कल आणि व्हायरल होणे यावर विचारमंथन
मुंबई, दि. ०२ : इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्म वर सामग्रीचे लोकशाहीकरण अधोरेखित करताना “आज, स्मार्टफोन असलेला कोणीही सर्जक आणि निर्माता असू शकतो”, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांवर विश्वासार्ह उपस्थितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रद्धा यांनी भारताच्या कथाकथनाच्या खोलवर रुजलेल्या वारशावर भर दिला. “आपण कथा ऐकत मोठे झालो – आपण आज जे आहोत याचा एक भाग आहेत कथा,” असे त्यांनी उद्धृत केले.
भारतीय सर्जकांसाठी सध्याचा काळ सुवर्णकाळ आहे असे नमूद करताना डिजिटल तंत्रज्ञान, परवडणारा डेटा आणि उत्साही युवा लोकसंख्येच्या एकत्रीकरणाकडे त्यांनी लक्ष वेधले आणि “भारतासाठी जगाचे आशय निर्मिती केंद्र बनण्याचा हा एक उत्तम काळ आहे,” असे मत व्यक्त केले. समाज माध्यमावरील यशोगाथा सांगताना, श्रद्धा यांनी आशय मांडणीतील विश्वासार्हतेच्या शक्तीवर आणखी भर दिला. “जेव्हा आशयनिर्मिती अंतःकरणातून होते तेव्हा ती साहजिकच लोकांना भावते. मी नेहमीच धोरणात्मक होण्याऐवजी विश्वासार्ह आशय पोस्ट करण्याचा प्रयत्न करते,” याकडे त्यांनी लक्ष वेधले.
श्रद्धा यांनी भारताच्या मीम संस्कृतीच्या वाढत्या प्रभावावर आणि इंस्टाग्रामसारखे प्लॅटफॉर्म, त्यांच्या ट्रेंडिंग ऑडिओ आणि हॅशटॅगसह, जनरेशन झेड प्रेक्षकांना आकर्षित करण्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावतात यावरही प्रकाश टाकला. प्रत्येक पिढी आपला अनोखा आवाज शोधते असे सांगून ट्रेंड किती लवकर तयार होतो आणि विकसित होतो हे पाहणे लक्षणीय आहे असे त्या म्हणाल्या.
इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनी भारतातील डिजिटल आशय निर्मितीत अत्यंत वेगाने होत असलेल्या परिवर्तनाबद्दल आपले विचार सामायिक करताना मेटाचा जागतिक दृष्टीकोन विशद केला. डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये क्रांती झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले, डेटाची कमी होत असलेली किंमत आणि हाय-स्पीड इंटरनेटची व्यापक उपलब्धता यामुळे सामग्री निर्मात्यांसाठी नवीन दरवाजे खुले झाल्याचे नमूद केले. भारतीय डिजिटल जगाशी जोडले जाण्यात तंत्रज्ञानाने कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे” याचा उल्लेख करत भारतात आशय निर्मितीमध्ये अभूतपूर्व वाढ दिसून येत आहे,” असे मोसेरी म्हणाले,.
इंस्टाग्रामवर अभिव्यक्तीचा प्रमुख प्रकार बनलेल्या व्हिज्युअल आशयाचा, विशेषत: रील्सच्या वर्चस्वाचा त्यांनी ऊहापोह केला. “व्हिज्युअल आशय मूलतःच अधिक आकर्षक आणि प्रभावी असतो. रील्सनी प्रत्येक व्यक्तीला तिच्या गोष्टी थोडक्या स्वरुपात आणि अधिक प्रभावी पद्धतीने सांगण्यास सक्षम बनविले आहे, जागतिक प्रेक्षकांशी जोडले जाण्यासाठी एक सृजनशील व्यासपीठ प्रदान केले आहे,” मोसेरी यांनी स्पष्ट केले.
“सृजनशील अभिव्यक्ती सक्षम करणे : जेन झी आशयाचा वापर कसा करते ” या विषयावरील परिसंवादात केवळ संभाषणच नव्हते; तर भारताच्या अमर्याद सृजनशील क्षमतेचा गौरव होता त्याचबरोबर डिजिटल कथनकारांच्या पुढच्या पिढीला सशक्त बनवण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका कशी बदलत आहे याचाही समावेश होता. डिजिटल प्लॅटफॉर्मने आशय निर्मितीच्या लोकशाहीकरणाचे काम सुरू ठेवल्यामुळे, संस्कृती, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता यांचा संगम जेन झी साठी आशय वापराच्या भविष्याला कसा आकार देत आहे, हे देखील या सत्रातून स्पष्ट केले गेले.
0000