मूल्य, रूढी आणि संस्कृतीमधून ब्रँडची निर्मिती – प्रेम नारायण

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मधील परिसंवाद

मुंबई, दि. ०१ : संस्कृती महत्त्वपूर्ण असून देशाची संस्कृती माहीत असेल, तर ब्रँड्स कसे तयार होतात हे समजते. लोकांची श्रद्धा, मूल्यं, रूढी आणि संस्कृती याचा अभ्यास करून जाहिरातीमधून ब्रँड रुजवता येतात, असे मत ओगिल्वी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेम नारायण यांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मधील ‘ब्रँड उभारणीसाठी संस्कृती हेच इंधन’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. यावेळी क्रिएटर्स, कंटेन्ट रायटर उपस्थित होते.

प्रेम नारायण म्हणाले की, राष्ट्राची संस्कृती ही तेथील लोकांच्या मनात – हृदयात असते. सर्व  ब्रँड्स आणि जाहिरात ही लोकांच्या हृदयाशी जोडलेली असते. त्यामुळे जर देशाची संस्कृती समजली, तर तेथील लोकांशी नाते जोडता येते.

जर जाहिरातदार किंवा फिल्ममेकर भारतासाठी काही तयार करत असतील, तर त्या भावनिक नात्याचा शोध घ्यावा लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सांस्कृतिक संदर्भ वापरून बदल घडवून आणता येते. भारतात चॉकलेटचं प्रतिव्यक्ती सरासरी सेवन फक्त २० ग्रॅम्स होतं. आज आपल्याकडे हे १६०-१७० ग्रॅम्स दरम्यान आहे आणि हे मोठ्या प्रमाणावर या ब्रँडमुळे झाले आहे. आपल्या देशात कोणताही सण, कोणतंही शुभकार्य, काहीही सुरूवात असो – गोड पदार्थ हा अविभाज्य भाग असतो. याचा विचार करूनच ब्रँड विकसित होतो. सांस्कृतिक ठिकाण किंवा क्षण हे ब्रँड रुजवण्यासाठी मोठ्या संधी असतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नारायण यांनी यावेळी विविध ब्रँडच्या जाहिरातीचे दाखले देत ब्रँड उभारणीसाठी ‘संस्कृती हेच इंधन’ या विषयावर सविस्तर माहिती दिली.

०००

गजानन पाटील/ससं/