लातूर, दि. ०१ : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्याच्या विकासाला गती देणारी कामे प्राधान्याने हाती घेतली जाणार आहेत. दळणवळण सुविधा वाढवून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. लातूर येथील नवीन बांधकाम भवन कार्यालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ, गणेश क्षीरसागर, अलका डाके, उपअभियंता संजय सावंत यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभाग नागरिकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करीत आहे. यापुढे राज्यात दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारून अर्थव्यवस्थेला गती दिली जाईल. यासाठी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि गतिमानपणे कार्य करावे, पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले. तसेच त्यांनी लातूर येथील नवीन बांधकाम भवनातून जिल्ह्यातील नागरिकांसाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण होण्याचा विश्वास व्यक्त केला.
लातूरच्या रस्त्यांवर ‘एआय’ची नजर; उपक्रमाचे कौतुक
लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सुमारे ३,००० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची देखरेख कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यांची सद्यस्थिती समजणे सुलभ झाले आहे. असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे लातूर सार्वजनिक बांधकाम मंडळ राज्यातील एकमेव आहे. पालकमंत्री श्री. भोसले यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्याची प्रशंसा केली. शासनाच्या १०० दिवसीय कृती कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांनी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांनी नवीन बांधकाम भवन आणि त्यातील सुविधांविषयी माहिती दिली.
नवीन बांधकाम भवन बांधकामामध्ये महत्वपूर्ण योगादन देणारे कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ, उपअभियंता संजय सावंत, कनिष्ठ अभियंता संजय आडे व विनोद खाडे यांच्यासह कंत्राटदारांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नवीन बांधकाम भवनाविषयी थोडक्यात
- मंजुरी आणि निधी: मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पात इमारतीसाठी ६७३.०८ लाख रुपये मंजूर.
- क्षेत्रफळ: एकूण १,७०६ चौ.मी.
- सुविधा:
- सर्व कार्यालये सुसज्ज आणि सर्व सोयींनी युक्त.
- प्रवेशद्वाराजवळ इमारतीचा सुस्पष्ट नकाशा, ज्यामुळे नागरिकांना कार्यालये आणि कार्यासने सहज शोधता येतात.
- प्रत्येक मजल्यावर दिशादर्शक फलक, नागरिकांची सनद, लोकसेवा हक्क अधिनियमानुसार सेवा माहिती आणि जनमाहिती अधिकाऱ्यांची माहिती.
- अभ्यागतांसाठी प्रतीक्षालय, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रसाधनगृह.
- पूर्ण झालेल्या आणि प्रगतीपथावरील प्रकल्पांची छायाचित्रे दर्शनी भागात प्रदर्शित.
- परिसर: मागील बाजूस वाहनतळ, बागबगीचा आणि सौंदर्यीकरण.
००००