चंद्रपूर, दि. 1 मे : प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईकेयांच्या हस्ते आज (दि.1) उद्घाटन करण्यात आले.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्यासह कक्ष प्रमुख कथा वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर, समाजसेवा अधीक्षक भास्कर शेळके, वरिष्ठ लिपिक दीपक शेळके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. वुईकेम्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थानिक स्तरावर स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णांना या कक्षाची माहिती झाली पाहिजे. गरीब रुग्णांना मुंबईला यासाठी चकरा मारा लागू नये म्हणून, स्थानिक पातळीवरच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर हा कक्ष उभारण्यात आला असून जनतेमध्ये याची जास्तीत जास्त जनजागृती करावी, असे पालकमंत्री डॉ. अशोक वुईकेयांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष स्थापनेचा उद्देश : समाजातील गरीब गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालय अंतर्गत उपचार मिळवून देणे, महात्मा ज्योतिबा फुले /आयुष्यमान भारत योजना तसेच इतर जनआरोग्य योजनांची माहिती रुग्णांना देणे व त्यांना संदर्भित करणे, आरोग्य संबंधित योजनेमध्ये समाविष्ट होऊ न शकणा-या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत करणे.
००००००