चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम 

चंद्रपूरदि. 1 मे : संपूर्ण देशात महाराष्ट्र हे आर्थिक संपन्न आणि प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्याप्रमाणेच नैसर्गिक वनाच्छादन असलेला चंद्रपूर जिल्हा हा जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्प, विविध उद्योग, उर्जानिर्मिती प्रकल्प, सैन्याकरीता लागणारी आयुधी निर्माणी आदीमुळे जागतिक पटलावर ओळखला जातो. जिल्ह्याची ही ओळख कायम राहावी, विकासाच्या मार्गावर जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी शासन आणि प्रशासन सैदव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस मुख्यालय येथे ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार

प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना सर्वप्रथम वंदन करून पालकमंत्री डॉ. वुईकेम्हणाले, स्वातंत्र्याच्या इतिहासापासून स्वत:ची ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार वेगवेगळ्या घटक राज्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेने वेग घेतला. याच अनुषंगाने 1 मे 1960 या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यासाठी मोठा लढा उभा करावा लागला. हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्र राज्याने सुरवातीपासूनच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक व इतर क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

सहा महिन्यांपूर्वी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भरभक्कम सरकार सत्तेत आले आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत आहे. तसेच पहिल्या 100 दिवसात सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या दृष्टीने देखील पाऊले टाकली आहेत. वैशिष्ट म्हणजे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सात कलमी कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

‘सर्वांसाठी घरे’ अंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदमार्फत एकाच वेळी जवळपास 35 हजाराच्यावर लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भुमिपूजन करण्यात आले आहे. औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन अंतर्गत जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या औद्योगिक परिषदेत 12 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून 17 हजार 431 कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्यात आली आहे. यातून 14 हजार थेट रोजगार निर्मिती होणार आहे, असे पालकमंत्री डॉ. अशोक वुईकेयांनी सांगितले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान अंतर्गत चंद्रपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, संदीप छिद्रावार, विजय बोरीकर, रविंद्र हजारे, शुभांगी सुर्यवंशी, अनिलकुमार घुले, अमुल भुते, युधिष्ठिर रैच यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे चांदा पब्लिक स्कुल, माउंट कार्मेल कॉन्व्हेंट, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा यांचा, आदर्श ग्राम महसूल अधिकारी प्रविण ठोंबरे यांना तसेच ‘पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ’ या ब्रीदवाक्य स्पर्धेतील हिमाशू संजय वडस्कर, समृध्दी गुप्ता, चांदणी बलराम झा यांचाही पालकमंत्री डॉ. अशोक वुईकेयांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

००००००

 

वृत्त क्र.300