मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर, दि.१ (जिमाका)- मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयातच तळ मजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. विधान परिषद सदस्य आ.संजय  केनेकर, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी,  एकनाथ बंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतिपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांची उपस्थिती होती.  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज होईल.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे  रुग्णांना वैद्यकीय उपचारकरिता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे, नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती आपल्याच जिल्ह्यात व्हावी तसेच नागरिकांच्या पैशाचा व वेळाचा अपव्यव टाळण्याकरिता हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती, दहशवादी हल्ला, दंगल इ मध्ये मृत किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य मदत कक्षाच्या माध्यमातून केली जाणार आहे. या कक्षाद्वारे रुग्णांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या इतर आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच वेळोवेळी आरोग्य शिबीरे घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी गोरे, लिपिक सचिन दोडे, समाजसेवा अधीक्षक श्यामसुंदर वाकळे या तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

०००००