महाराष्ट्र दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन

रायगड (जिमाका) दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन  करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धून वादन करण्यात आली. राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व यांनी केले. पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल,  गुन्हे शाखेचे श्वान पथक, पोलीस दलाचे डायल- 112 पोलीस वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक,  अग्नीशमन दल, वैद्यकीय सेवेच्या डायल 108 सेवेतील वाहन आदींनी यावेळी संचलनात भाग घेतला.

जिल्हा व राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे- महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे

समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी नवनवीन संकल्पना राबवित राज्याला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न शासनाचा असून जिल्हा आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमीत्त तसेच कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मंत्री कु. तटकरे म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपल्या राज्याच्या विकासाचा अध्याय नव्याने सुरू झाला आहे.  आज महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.  राज्य शासन गतिमान व सुशासनाचे ध्येय साध्य करण्यासाठी “त्रिसूत्री कार्यक्रम” राबवित आहे. राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांत लोककल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना गती देण्यासाठी सर्व विभागांच्या कामांना गती दिली आहे. मागील 100 दिवसांत जिल्ह्यात विविध विभागानी उत्कृष्ट कामगिरी बजावून प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महामुंबईचा विस्तार रायगड जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नवे जाळे या परिसरात विणले जात आहे.

नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच नव-उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र सागरी विकास धोरण-2023”मध्ये बंदर विकासाकरीता स्वामित्वधन, अकृषिक कर, वीज शुल्क, मुद्रांक शुल्क यातून सूट देण्यात आली आहे. वीजेसाठी औद्योगिक दर लागू करण्यात आला आहे.  प्रवासी जलवाहतूक व किनारी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रवासी व बंदर करातून सूट देण्यात आली आहे.  बंदरांच्या करारांचा कमाल कालावधीही 90 वर्षे करण्यात आला आहे असेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या अर्थसंकल्पात गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे.  दिघी येथील  जेट्टींची कामे प्रगतीपथावर आहेत. काशिद येथील तरंगत्या जेट्टीचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी 200 खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय मंजुर करण्यात आले आहॆ.  नवी मुंबईत उलवेमध्ये 194 कोटी 14 लाख रुपये किंमतीच्या “युनिटी मॉल”चे काम प्रगतीपथावर आहे.

किमान 90 दशलक्ष प्रवासी आणि 2.6 दशलक्ष टन मालवाहू क्षमता असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील सर्वात मोठे ‘ग्रीनफिल्ड विमानतळ’ म्हणून पुढे येत आहे. जून 2025 पर्यंत या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा कार्यान्वयीत करण्याची योजना आहे.

राज्यातील गड-किल्ले, मंदिरे व महत्त्वाची संरक्षित स्मारके यांच्या संवर्धनासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधीची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  शासनाने, राज्यभरात रक्तदान मोहीम, अवयव दान, कर्करोग जनजागृती आणि उपचार, लठ्ठपणा जागरुकता आणि उपचार, थायरॉईड अभियान, मोतीबिंदू- अंधत्व प्रतिबंध अभियान आणि स्वच्छ मौखिक आरोग्य अभियान अशी 7 आरोग्य अभियाने सुरू केली आहेत. या अभियानाची जिल्ह्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. तसेच क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली.

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, अन्नासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय घेण्याची भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे.    महिलांकरिता रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची सुमारे 18 हजार रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.  राज्यात माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. हे चित्र आशादायी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याच्या कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे जलद व प्रभावी वितरण सुलभ होण्यासाठी “अॅग्रीस्टॅक” कृषी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. सरकारने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. मत्स्य व्यवसायाला शेतीप्रमाणे विमा व नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे .कोकण किनारपट्टीतील असंख्य मत्स्य व्यावसायिकांना थेट लाभ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन, सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण सर्व एकत्रित काम करू या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विविध पुरस्कारांचे वितरण

यावेळी महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे  यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलात सेवेत सतत 15 वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. पुरस्कारार्थीची नावे पुढीलप्रमाणे- पोनि /संदिप अभिमन्यू बागुल,  रापोउनि/संजय दिनकर साबळे, पोउनि/तानाजी रामचंद्र वाघमोडे, श्रेणी पोउनि / मोहन दत्ताराम बहाडकर, श्रेणी पोउनि/गजानन पांडुरंग म्हात्रे, श्रेणी पोउनि/गणेश अंकुश भिलारे, सफो / नितीनकुमार धोंडू समजिसकर, सफौ / राजेश दत्तात्रेय मारकंडे, सफौ / जितेंद्र विठ्ठल म्हात्रे,) सफो / सुखदेव यशवंत सुर्यवंशी, सफौ / जितेंद्र दामोदर साटोटे, सफो / नरेंद हासू म्हात्रे, सफौ / किशोर गजानन गुरव, सफो / सुभाष पोसुराम म्हात्रे, सफो / ललीतकुमार वसंत कडू, पोह / 1284 अतुल रामचंद्र वडकर, पोह / 847 संतोष नामदेव चव्हाण, पोना / 328 प्रकाश रामा हालेखाना, पोशि / 805 रितेश बाळकृष्ण यादव, पोशि / 557 संकेत सुधीर पाटील (खेळाडू), पोशि / 1573 शनिराज हणमंत हारगे (खेळाडू)

यावेळी अवयवदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.  यामध्ये प्रितेश राजाराम पाटील,बस्वाराज म.बिडवे यांचा सन्मान केला. महाराष्ट्र राज्aत राबविण्यात येणाऱ्या स्टुडंट पोलीम कॅन कॅडेट (SPC) या कार्यक्रमात भाग घेवून कोंकण परिक्षेत्र स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या चिंतामणराव देशमुख माध्यमिक विद्यालय, रोहा चा सन्मान करण्यात आला

0000000