महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षा’चे उद्घाटन

जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार रूग्णांना मदत

मुंबई, दि. ३०: राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, त्यानुसार या कक्षाचे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री / मंत्री/ राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात २२ फेब्रुवारी २०२५ रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती, या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पुर्ण क्षमतेने कार्यान्वयित करणेबाबत निर्देश दिले होते.

वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून सदरचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

काय असणार कक्षाची जबाबदारी

⏩ अर्ज करण्यासाठी रूग्ण व नातेवाईकांना मदत करणे.

⏩ प्राप्त अर्जांची सद्यस्थिती उपलब्ध करुन देणे.

⏩ रूग्ण व नातेवाईकांच्या समस्यांचे निराकरण करणे.

⏩ आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे.

⏩ नागरिकांमध्ये कक्षा बाबत जनजागृती आणि प्रसिद्धी करणे.

⏩ कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे.

⏩जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे.

⏩ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अधिकाधिक देणग्यांचा ओघ येण्याकरिता प्रयत्न करणे.

⏩ अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे.

रूग्ण व नातेवाईकांना होणार कक्षाचे फायदे

▶️ रूग्ण व नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला अर्ज करण्याकरिता मदत मिळणार.

▶️ अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, माहिती सहज उपलब्ध होणार.

▶️ संलग्न रूग्णालयांची यादी मिळणार.

▶️ अर्ज किंवा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही.

▶️ अर्जाची स्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात समजणार

०००