प्रत्येक शासकीय विभागाने नियोजन समितीच्या निधीमधून केलेल्या चांगल्या कामांची यादी तयार ठेवावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर, दि. 19(जिमाका):- प्रत्येक शासकीय विभागाला त्यांच्या विभागाअंतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो. जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रत्येक विभागाने केलेल्या चांगल्या दहा कामांची यादी तयार करून ठेवावी. या सर्व कामांना आपण प्रत्यक्ष भेट मंजुरीप्रमाणे कामे पूर्ण झाली आहेत का तसेच कामांचा दर्जाही तपासणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सर्व विभागप्रमुख, पाणीटंचाई व अन्य विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या सह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत माहे मार्च 2024 अखेरपर्यंत सर्व संबंधित शासकीय विभागाने त्यांच्याकडील मंजूर निधी जवळपास शंभर टक्के खर्च केलेला दिसून येत आहे. तर सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 702 कोटीचा आराखडा मंजूर असून त्यातील 233.81 कोटी प्राप्त झालेले आहेत. तरी सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी विधानसभा आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहित धरून माहे ऑगस्ट 2024 पर्यंत जास्तीत जास्त कामे निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश देऊन ते सुरू करण्याबाबतची कार्यवाही अधिक गतिमान करावी. शिक्षण विभागाने प्राथमिक शाळा दुरुस्तीवर अधिक खर्च करून सर्व शाळा व्यवस्थित कराव्यात.  तसेच सर्व नगरपालिकांना देण्यात आलेला निधी मंजूर कामावर व्यवस्थित खर्च होत आहे का याबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका यांनी प्रत्येक आठवड्याला ऑनलाइन बैठक घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यात पावसाने समाधानकारक सुरुवात केलेली असून दिनांक 1 जून 2024 ते आज पर्यंत उजनी धरणाच्या पाणी साठवण क्षमतेत 7 टीएमसी पाण्याची भर पडली आहे. सद्यस्थितीत वजा 46.71 टक्के पाणी उजनी धरणात उपलब्ध आहे. तर प्रखर टंचाई कालावधीत 214 टँकर जिल्ह्यात सुरू होते ते चांगल्या पावसामुळे 127 टँकर पर्यंत कमी झालेले आहेत. पुढील काळातही चांगला पाऊस होऊन टँकरची संख्या शून्यावर येईल. तरीही जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. त्याबरोबरच 74 कोटी 35 लाख 38 हजाराच्या टंचाई कृती आराखड्यास त्यांनी मान्यता प्रदान केली.

सोलापूर महापालिकेने दुहेरी पाईपलाईनचे उर्वरित 20 टक्के काम माहे नोव्हेंबर 2024 अखेर पूर्ण करून सोलापूर शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत. पाणी वितरण व्यवस्था तसेच नगरोउत्थान अंतर्गत घेण्यात आलेल्या कामासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगून सोलापूर महापालिका व वीज वितरण कंपनीने परस्परात योग्य समन्वय ठेवून पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी सूचित केले.

यावर्षी पावसाने समाधानकारक सुरुवात केली असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना बी बियाणे व पुरेसा खत पुरवठा करणे आवश्यक आहे. नियमित डीएपी खत पुरेसे उपलब्ध होत नसेल तर लिक्विड डीएपी खत वापरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. मागील वर्षीच्या दुष्काळातील पीक विम्याचे 25 टक्के आग्रीम रक्कम 113 कोटी शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मिळालेले आहेत, तरी उर्वरित रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. राज्य शासनाने एक रुपयात पिक विमा योजना लागू केल्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन पीक विमा भरून पिक नुकसानी पासून सुरक्षित केलेली होती. सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख आठ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी पिक विमा भरण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले.

वीज वितरण कंपनीने दुरुस्ती तसेच फ्युज पोल पडणे, लाईन खाली पडणे, तुटणे या बाबीच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना राबवून सर्व नागरिक व शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्याची दक्षता घ्यावी. दुरुस्तीची कामे करत असताना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आवश्यक निधीची मागणी नियोजन समितीकडे तात्काळ करावी, असे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयास अद्यवतीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल त्यासाठी तंत्रनिकेतने प्रस्ताव करून पाठवावा. तसेच तंत्रनिकेतनचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करून शासनाला सादर करावा, अशाही सूचना त्यांनी दिल्या. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी उजनी पाणी उपलब्धता, पाऊस, खते बी बियाणे, पिक विमा, पी एम किसान योजना, वीजपुरवठा सुरळीत असणे, सोलापूर शहर दुहेरी पाईप लाईन, वितरण व्यवस्था, ड्रेनेज सिस्टीम सह  नागरिकांच्या विकासाबाबतचे प्रश्न व सूचना मांडल्या.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित विभागाकडून कामे वेळेत पूर्ण करून घेण्यात येतील असे सांगितले. तसेच ज्या विभागांना नियोजन समिती मधून निधी आवश्यक आहे त्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत असेही सूचित केले. तर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका विना पवार, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. शिंदे यांनी आपल्या विभागाच्या वतीने सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याची खात्री दिली.