पुनर्वसनाची कामे गतीने आणि दर्जेदार करा – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा दि. 7 (जिमाका):  पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी, (जिंती), काहीर, या अतिवृष्टीमुळे भूस्खलन बाधित गावांच्या पुनर्वसनास शासनाने मान्यता दिली आहे. या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनाअंतर्गत बाधित कुटुबांना द्यावयाची प्रस्तावित असलेली 558 घरकुले व इतर सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून ही कामे गतीने आणि दर्जेदारपूर्ण करा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
पाटण तालुक्यातील दरडग्रस्त व भूस्खलनग्रस्त गावांच्या पुनर्वसन, बांधकाम व पायाभूत सुविधांच्या कामांबाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रातांधिकारी सुनील गाडे, यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
भूस्खलनबाधित गावांमधील कुंटुबांचे गोकूळ तर्फ पाटण, काहीर, शिद्रुकवाडी (धावडे), चाफेर, देशमुखवाडी, मोडकवाडी याठिकाणी घरकुले बांधून देवून पुनर्वसन करण्यात येणार आहे. 199 कोटी 57 लाख खर्चून पुनर्वसनाचे काम करण्यात येणार आहे. घरे बांधून देणे व तेथील ले ऑउट विकासकामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी करावी असा निर्णय झालेला आहे. पुनर्वसीत ठिकाणांमध्ये प्राथिमक शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, समाजमंदिर, सार्वजनिक स्वच्छता गृहे, खेळाचे मैदान, कंम्पाऊंड भिंत, प्रवेश कमान, पथदिवे, पाणीपुरवठा सुविधा, वैयक्तिक एकल विद्युत जोडणी, रेनवॉटर हारवेस्टिंग, सोलार सिस्टीम, इमारतींकरीता आतील व बाहेरील विद्युतीकरण, पुनर्वसन गावांमध्ये 9 मीटर व 12 मीटर रुंदीचे डांबरी रस्ते, रस्त्यालगत दुतर्फा सिमेंट काँक्रीटच्या गटारी, जनावरांकरीता पिण्याच्या पाण्‍याची सुविध अशा सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या सर्व सुविधा व घरकुलांची कामे अत्यंत दर्जेदार करावीत आणि  वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी यंत्रणांना दिले आहेत.
बाधित कुंटुबांना देण्यात येणारी घरकुले 590 चौ. फूट बांधीव क्षेत्रफळाची सिमेंट काँक्रेटची दर्जेदार व आकर्षक असणार असून यामध्ये तळमजल्याला हॉल किचन आणि स्वच्छता गृह, पहिल्या मजल्यावर बेडरूम आणि स्वच्छता गृह अशी ती होणार आहेत. प्रत्येक घरकूल 15 लाख 40 हजार रुपये खर्चाचे होणार आहे. सदरची घरकुले अतिशय आकर्षक व दर्जेदार आणि भक्कम होणार असून त्याची संबंधित कुंटुबांना संकल्‍पना स्पष्ट व्हावी, यासाठी प्रत्येक कामाच्या साईटवर या घरकुलांची संकल्पना चित्रे फ्लेक्स स्वरूपात लावण्यात यावी, असे निर्देशही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
00000000