डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत; लष्कराच्या मदतीची वेळ येऊ न देणे ही सर्वांची जबाबदारी - उपमुख्यमंत्री अजित पवार

1 टिप्पणी


जीवनावश्यक वस्तू घरपोच-सोसायटीपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन व्हावे

मुंबई, दि. 26 : कोरोना विषाणू प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पोलीस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत घेण्यात आली आहे. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन’, संचारबंदी असली तरी  दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, कुकिंग गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी होणारी नागरिकांची गर्दी चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करण्याबाबत स्थानिक स्वराज संस्थांनी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बारामती, वाई शहरात अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजाने, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. ही बेपर्वाई चिंताजनक आहे. वसईत पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. अशा घटनांमुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. जनतेने कोरोनाचे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावे, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही  त्यांनी केले आहे.

मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या एका पत्रकार बांधवाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथे माजी मुख्यमंत्री आणि उपस्थित पत्रकारांना संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ऑनलाईनसंवाद साधून सुरक्षितता राखावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनातील मुद्दे..
  ·      डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले दुर्दैवी. असे हल्ले सहन केले जाणार नाहीत.
  ·      कोरोना प्रतिबंधक कार्यात अडथळे आणणाऱ्या व डॉक्टर, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करणार
  ·      पोलीस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त व संयम पाळावा.
  ·      लोक बाजारात, रस्त्यावर ज्या पद्धतीने गर्दी करत आहेत, सुरक्षित अंतर पाळत नाहीत, यामुळे करोनाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढत आहे. 
  ·      नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होणे कोरोना प्रादुर्भावासाठी चिंताजनक आहे.
  ·      कोरोना प्रतिबंधक अंमलबजावणीसाठी, लष्कराची मदत घ्यायला लागू नये हे पाहणे आपली सर्वांची जबाबदारी.
  ·      प्रवासबंदी असताना दुधाच्या टँकरमधून प्रवास करण्यासारख्या घटना गंभीर
  ·      राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत
  ·      दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू घरपोच, सोसायटीपर्यंत उपलब्ध करण्याचे नियोजन व्हावे.
  ·      केंद्रीय वाहतूकमंत्री  नितीन गडकरी यांनी केलेल्या टोलमाफीच्या  घोषणेचे स्वागत.
00000

1 टिप्पणी

  1. साहेब, डॉक्टराना मारहाणीचा ,मालेगाव ( नाशिक), व्हिडिओ मिळाला असेलच तुम्हाला त्यावर काय कार्यवाही होईल.

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारा समर्थित.