राज्यातील आरोग्य केंद्रांच्या औषध पुरवठ्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून आढावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


औषधांच्या उपलब्धतेसाठी हाफकिन संस्थेत बैठक

मुंबई, दि.7 : राज्यातील आरोग्य केंद्रांमध्ये औषधांच्या उपलब्धतेसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हाफकिन संस्थेची बैठक घेतली. या वर्षासाठी औषधांची मागणी यादी आरोग्य विभागाने फेब्रुवारी अखेरपर्यंत हाफकीन संस्थेच्या खरेदी कक्षाकडे द्यावी. औषध आणि उपकरणांचे प्रमाणीकरण (स्टॅण्डर्डायजेशन) करून एकत्रित मागणी करावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

पुरवठा झालेल्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी विभागनिहाय प्रयोगशाळा सुरू करण्याचा मानस असल्याचे मंत्री श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये, आरोग्य संस्थांमध्ये औषधांची उपलब्धता हा प्रश्न सातत्याने चर्चिला जातो. आरोग्य विभागाला लागणारी औषधे आणि उपकरणे वेळेवर खरेदी करावी, असे निर्देश हाफकिन खरेदी कक्षाच्या अधिकाऱ्यांना देताना आरोग्य विभागाने देखील वेळेत मागणी नोंदवावी, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केली आहे.

हाफकीनचा खरेदी कक्ष अधिक बळकट करावा, मनुष्यबळ उपलब्ध करून औषध खरेदी प्रक्रियेला गती द्यावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

औषध खरेदीची मागणी नोंदविताना जीव वाचविणारी, अत्यावश्यक आणि गरजेनुसार अशी वर्गवारी करावी असे निर्देश देताना राष्ट्रीय अधिस्वीकृत प्रयोगशाळा मंडळाच्या लॅबला भेट देऊन कार्यपद्धती आणि लागणारी उपकरणे यांचा आढावा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांनी सादरीकरण केले.
००००
अजय जाधव/विसंअ/७.२.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.