गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 13 : गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती देण्याच्या सूचना गृहमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी आज वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या.

गृहमंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित बैठकीत गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित बांधकामाचा आढावा घेण्यात आला. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करुन या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या निधीबाबतचा आराखडा तयार करावा, तसेच यासाठी सुधारित प्रशासकीय आदेश काढण्याच्या सूचना श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महाविद्यालयाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरु करण्यात यावी. या महाविद्यालयासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, आवश्यक वैद्यकीय कर्मचारी वर्ग तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या.

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामापूर्वीची निविदा आणि इतर प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.