महिलांच्या सक्षमीकरणासाठी युवा पिढीने जिद्दीने लढावे - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि. 30 : महिलांच्या सर्वंकष सक्षमीकरणासाठी युवा पिढीने महिला सबलीकरणाची लढाई जिद्दीने लढावी, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

बिजींग येथील चौथ्या विश्व महिला संमेलनास (२८ ऑगस्ट,१९९५ ते १४ सप्टेंबर, १९९५) २५ वर्षे  पूर्ण होत असल्याने राज्य व देशपातळीवरील झालेली प्रगती आणि त्याबाबतची आव्हाने याबाबतचा आढावा घेण्यासाठी कृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

ही कृती कार्यशाळा विधान मंडळ, स्त्री आधार केंद्र, पुणे आणि डी.एस.टी, पुणे (Development Support Team, Pune) तसेच ट्रान्स एशियन चेंबर आँफ काँमर्स अँड ईंडंस्ट्रीज ,मुंबई  यांच्या संयुक्त विद्यमाने २९ जानेवारी २०२० (बुधवारी) रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाची सांगता करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवसभराच्या कार्यशाळेचा आढावा घेतला आणि समस्येच्या उपायांवर प्रकाश टाकला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, निर्णय प्रक्रिया विचारांपूरती मर्यादित न राहता कृतीतून सिद्ध झाली पाहिजे. १९९५ च्या बीजिंग परिषदेनंतर पुढील परिषद १० वर्षां ऐवजी  २५ वर्षांनी होत आहे, याकडे लक्ष वेधले. युवा पिढीने महिला सबलीकरणाची ही लढाई पुढील २५ वर्षे जिद्दीने लढावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 'दारिद्र्य हा समाजाला लागलेला कलंक आहे आणि दारिद्र्याच्या झळा महिला वर्गालाच अधिक भोगाव्या लागतात. त्यामुळे महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे'. विविध विषयांवरील सादरीकरणामुळे सरकार काय काय कामे करते, विविध योजनांमागील सरकारची भूमिका काय, हे स्पष्ट झाले. महिलांच्या सक्षमीकरणा मध्ये सर्व विषयांचा एकत्रीत विचार करावा लागेल. ही एकत्रित उद्दिष्टे म्हणजे शाश्वत विकास होय," असे मत विधानसभा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधान मंडळ यांच्या सहकार्याने कार्यशाळा संचालित करण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नीलम गोऱ्हे होत्या. 

या कार्यशाळेची सुरुवात 'महाराष्ट्र राज्य सरकारची शाश्वत विकासाची उद्दिष्टे, याबाबतचे नियोजन आणि अंमलबजावणी' या सादरीकरणाने झाली. नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.देबाशिष चक्रवर्ती यांनी सादरीकरणात शाश्वत विकासाची १२ उद्दिष्टे, त्यांचं कामकाज, निधी, संसाधने या बाबी स्पष्ट केल्या. या उद्दिष्टांमधील ' पाचवे उद्दिष्ट - स्त्री पुरुष समानता ' सविस्तरपणे मांडून ते लवकरात लवकर कसे साध्य करता येईल, हेदेखील स्पष्ट केले.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, महिलांना चूल आणि मूल ही भूमिका निभावण्यासाठी समाज तिच्यावर बंधने लादत असतो. कार्यशाळेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिला एका छताखाली एकत्र आल्या, ही अभिमानाची बाब आहे,'. महिला बाल कल्याण विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील याबाबत त्यांनी आश्वासित केले.
   
ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अरविंद कुमार यांनी शाश्वत विकासाचे नियोजन करण्याचे मार्ग, येणारी आव्हाने यावर सादरीकरण केले.

तसेच गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय कुमार यांनी महिला सबलीकरणाच्या उपायांचा आढावा घेत भविष्यातील योजना मांडल्या.

पहिल्या सत्रातील शेवटचे सादरीकरण आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा यांनी केले.त्यांनी आदिवासी विभागातील विकासाचा आराखडा मांडून त्याचे सकारात्मक परिणाम दाखवले.' लोकांच्या सहभागाला तांत्रिक आधार दिला की शाश्वत विकास साध्य करता येतो. सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक घटकांना एकत्र सामावून घेतले की शाश्वत विकासाचा मार्ग सोपा होतो,' असे मत त्यांनी व्यक्त केले.
   
या कार्यशाळेस अर्जेन्टिनाच्या उप  वाणिज्य दुत श्रीमती सिसिलिया रिसलों, ब्राझीलच्या उप वाणिज्य दूत श्रीमती इरिका पेट्रोईका व थायलंड चे प्रभारी राजदूत श्री थनावत सिरिकल यांनीही आपल्या देशातील शासनाच्या प्रयत्नाबाबत सविस्तर विवेचन केले. अर्जेन्टिनामध्ये महिलांना सर्व क्षेत्रामध्ये 50 टक्के आरक्षण आहे असे श्रीमती सिसिलिया रिसलों यांनी स्पष्ट केले. आ.मनिषा कायंदे, विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत, ज्योती ठाकरे, अध्यक्ष, माविम,

सामाजिक कार्यकर्ते चेतना सिन्हा,मिनार पिंपळे,मिनी बेदी,डॉ.मंजुषा मोळवणे ऊपसचिव,महिला आयोग ,नीरजा भटनागर, हेमांगी वरळीकर,संजय भिडे,शिरीष कुलकर्णी,मुमताज शेख,मनिषा तोकले, अनुराधा सहस्त्रबुद्धे ,आदि सामाजिक कार्यकर्ते सहभागी होते.

या कार्यशाळेस राज्यातील विविध भागातून महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी हजर होते.

ब्राझिलच्या  डेप्युटी कौन्सुल जनरल इरिका पेट्रोटा यांनी त्यांच्या देशातील स्त्रीविषयक कायदे  विशद केले. त्यासह देशात ५२% महिलांची संख्या असताना ११% स्त्रियाच निर्णय प्रक्रियेत सहभागी आहेत, अशी खंत व्यक्त केली. भारतासारख्या देशाकडून शिकण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू, असे म्हणत त्यांनी भारतीय निर्णय प्रक्रियेतील स्त्रियांचे स्थान बळकट असल्याचे मत व्यक्त केले.

यानंतर अर्जेंटिनाच्या कौन्सुल जनरल सिसिलिया रिसोलो यांनी निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे, असे म्हटले. तसेच सर्व स्तरांवर स्त्रियांना आणि पुरुषांना समान आरक्षण मिळाले पाहिजे, तेव्हाच असमानता नष्ट होईल, असे केले.

थायलंडचे Acting Consul General Thanawat Sirikul यांनी स्वदेशातील स्त्रियांचे बळकट स्थान सर्वांसमोर मांडले. थायलंडमध्ये एकूण लोकसंख्येपैकी ५१%  स्त्रिया असून ७० टक्क्यांहून अधिक स्त्रिया कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे नेतृत्व करत असल्याचे सिरिकुल यांनी सांगितले.

पहिल्या सत्रानंतर गटचर्चा आयोजित करण्यात आली. दिलेल्या चार विषयानुरूप चार गट तयार करण्यात आले आणि गटात झालेली चर्चा सारांश स्वरूपात गट प्रतिनिधीने सर्वांसमोर मांडली.

'महिला व बाल विरोधी होणारा हिंसाचार : कार्य प्रणाली व कृती ' हा विषय मांडताना विविध कायदे, त्यांच्यातील त्रुटी (उदा. Poxo), जात पंचायत, कौमार्य चाचणी, योजनांची जाणीव व अंमलबजावणी , महिलांवर होणारे मानसिक अत्याचार इत्यादी मुद्दे संपूर्ण गटाच्या वतीने अनुराधा सहस्रबुद्धे यांनी मांडले.

'महिलांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग व महिला प्रश्नांचा अजेंडा ' हा विषय मांडताना ज्योती ठाकरे यांनी गटाच्या वतीने निर्णय प्रक्रियेच्या ५ महत्वाच्या पायऱ्या मांडल्या. यांत योजनेची माहिती, नियोजन, नियंत्रण , अंमलबजावणी आणि पडताळणी यांचा समावेश होता. तसेच राजकारणासह सर्व क्षेत्रांत महिलांना आरक्षण मिळायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

'हवामान बदल, शाश्वत विकासाची उद्दिष्टे व सामाजिक सहभागातून उत्तम कार्य पद्धतीची उदाहरणे ' या विषयावर विनायक गार्डे यांनी आदर्श गावाची संकल्पना मांडली.

'शासनाची धोरणे व स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक सहभागाच्या दिशा ' हा विषय मांडताना विजयश्री पेडणेकर यांनी धोरणांवर दृष्टिक्षेप टाकला.

यानंतर माणदेशी संस्थेच्या चेतना सिन्हा यांनी या कृती कार्यशाळेस ऐतिहासिक घटनेची उपमा देत महिलांनी उद्योग जगतात नेतृत्व करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या उपसचिव डॉ. मंजुषा मोळवणे यांनी महिला सक्षमीकरणासाठी पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे म्हणत पुरुषांमध्ये संवेदनशीलता जागृत होणे आवश्यक असल्याचे म्हटले.

डेव्हलपमेंट सपोर्ट टीम, पुणे या संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त श्रीमती मिनी बेदी यांनी ' अच्छी दुनिया ' निर्माण करण्यासाठी आपण स्वतःपासून प्रयत्न सुरू करूयात, असे आवाहन केले. 

कृती कार्यशाळेचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.