शेती कुंपण योजना मोठ्या प्रमाणात राबविणार - वन मंत्री संजय राठोड यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 9 : वन्य प्राण्यांचा जनतेला त्रास होऊ नये यासाठी शेती कुंपण योजना मोठ्या प्रमाणात राबविणार असून शेतीच्या संरक्षणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. वनमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्रालयात आयोजित विभागाच्या पहिल्याच आढावा बैठकीत श्री.राठोड बोलत होते.

वनमंत्री श्री. राठोड म्हणाले, येणाऱ्या काळात वन विभाग अधिक लोकाभिमुख होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. वन पर्यटनाला चालना देण्यासाठी विभाग प्रयत्नशील राहिल. वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या अनुषंगाने संरक्षित क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. संरक्षित क्षेत्रातील 110 गावांपैकी 66 गावांचे पुनर्वसन झालेले आहे. उर्वरित गावांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येईल. पुनर्वसित गावांना तातडीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. वन्यजीव विभागाकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करा, वाघाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कॉरिडॉर राखावा तसेच राज्य वन्यजीव मंडळाची तातडीने पुनर्रचना करावी, अशा सूचना वनमंत्र्यांनी यावेळी केल्या.सामाजिक वनीकरणाचे काम अधिक गतीने करण्याची गरज असल्याचे सांगून वनमंत्री म्हणाले, वृक्षलागवड मोहिम पूर्वीप्रमाणेच सुरु राहिल. या मोहिमेत जी झाडे लावली ती जगली पाहिजेत. तरच ही मोहिम यशस्वी होऊ शकते. महसूल विभागाच्या धर्तीवर वन विभागाची दर 3 महिन्यांनी वरिष्ठ वनाधिकांऱ्याची परिषद (फॉरेस्ट कॉन्फरन्स) आयोजित करावी, अशी सूचना त्यांनी केली. येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ही परिषद आयोजित करण्यात येईल, असे ते म्हणाले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले, आदिवासी क्षेत्रातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी अधिक निधीची गरज आहे.  त्यासाठी आपण पाठपुरावा करु. मृद संधारण कामांसाठी तसेच पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि योजना प्राधिकरण (राज्य कॅम्पा) च्या निधीत वाढ करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे तसेच वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक राम बाबु, प्रवीण श्रीवास्तव, नितीन काकोडकर, एस. के. राव तसेच विभागाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान प्रधान सचिव विकास खारगे, नितीन काकोडकर, विरेंद्र तिवारी यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या कामाची व योजनांची माहिती मंत्री व राज्यमंत्री महोदयांना दिली.

००००

देवेंद्र पाटील/विसंअ/9.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.