दिव्यांग महामंडळ आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या कामाला गती देणार - धनंजय मुंडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 14 : दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी या महामंडळाच्या अडीअडचणी सोडवू तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाच्याही काही समस्या आहेत,  त्या सोडवून या दोन्ही महामंडळांच्या कामकाजाला गती देणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
      
मंत्रालयात आज दिव्यांग वित्त व विकास महामंडळ आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी श्री. मुंडे बोलत होते.  यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे  प्रधान सचिव दिनेश वाघमारे उपस्थित होते.

श्री. मुंडे म्हणाले दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांसाठी केंद्र सरकारच्या योजनांमधून निधी मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. दिव्यांगांसाठी मोबाईल व्हॅनची योजना सुरु करण्यासाठी आवश्यक असणारा निधी मिळऊन देऊ. महामंडळांसाठी नवीन योजनांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही श्री. मुंडे यांनी दिले.
          

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे भागभांडवल 300 कोटींवरुन 500 कोटींपर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.  एनएसएफडीसी वसुलीसाठी आवश्यक असणारा निधीही  मिळवू.  महामंडळामध्ये 2012 ते 2015 च्या कालावधीत झालेल्या अनियमिततेबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल. महामंडळामार्फत केलेल्या अवैध नोकरभरतीबाबतही त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.

या दोन्हीही महामंडळांच्या लाभार्थ्यांना योग्य अशा योजनांचा लाभ देण्यासाठी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिशन मोडमध्ये काम करावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे शासन खंबीरपणे उभे राहील असेही श्री. मुंडे यावेळी म्हणाले.

यावेळी दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश डिंगळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे  विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम बगाडे व अधिकारी उपस्थित होते.
००००
दत्तात्रय कोकरे/विसंअ/14.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.