महालक्ष्मी सरस प्रदर्शन १७ जानेवारीपासून - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


महाराष्ट्रासह 29 राज्यातील बचतगट, ग्रामीण महिला कारागीर होणार सहभागी


मुंबई, दि. 14 : मुंबईकरांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले आणि ग्रामीण भागातील बचतगटांच्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवून देणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन यंदा शुक्रवार 17 जानेवारीपासून सुरु होत आहे. यंदा प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रासह 29 राज्यातील स्वयंसहाय्यता गट व ग्रामीण महिला कारागीर सहभागी होणार आहेत. यामध्ये 511 स्टॉल असणार असून त्यापैकी 70 खाद्यपदार्थाचे स्टॉल असणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी दिली. शॉपींगची आवड असलेल्या व्यक्ती आणि खवय्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. हे प्रदर्शन वांद्रे (पूर्व) येथील बीकेसीमधील एमएमआरडीए मैदान क्रमांक 1,4,5 आणि 6 येथे 17 जानेवारीपासून 29 जानेवारी पर्यंत सुरु असेल. प्रदर्शन सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामुल्य आहे. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतील. जास्तीत जास्त नागरीकांनी प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी व गावांमधून आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

'महालक्ष्मी सरस'च्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल स्वयंसहाय्यता गट दरवर्षी करत असतात. मागील दीड दशकात महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अंदाजे 8 हजार स्वयंसहाय्यता समूहाने मुंबईकरांना सेवा दिली आहे. पहिल्यावर्षी 50 लाखाची आर्थिक उलाढाल झाली होती तर मागील वर्षी जवळपास 12 कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे आणि कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा

ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, ग्रामीण भागातील खाद्य पदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. यामध्ये जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी व तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा - पांढरा रस्सा, सोलापुरची शेंगाचटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ इत्यादी बाबी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय कोल्हापुरी चप्पल, आदीवासी कलाकुसरीच्या वस्तू, पैठणी साड्या यांसह देशातील विविध २९ राज्यातील कारागिरांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करता येणार आहेत.

राज्यात 4.23 लाख बचतगटांची स्थापना

राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मूलन करण्यासाठी राज्यात ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानाची अंमलबजावणी राज्यातील 34 जिल्हे व 351 तालूक्यात इन्टेन्सिव्ह पध्दतीने करण्यात येत आहे. अभियानांतर्गत आतापर्यत 4.23 लक्ष स्वयंसहाय्यता गटांची स्थापना झालेली असून त्यामाध्यमातून 45 लक्ष कुटुंबे अभियानाशी जोडली आहेत. अभियानामार्फत जवळपास 823 कोटी रुपये एवढा समुदाय निधी तर बॅंकामार्फत 6 हजार 600 कोटी रुपयांचे कर्ज गटांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अभियानांर्गत 10.83 लक्ष कुटुंबांनी उपजीविकेचे विविध स्त्रोत (Activities) निर्माण केले असून त्या माध्यमातून जवळपास रु. 1070 कोटीचे उत्पन्न निर्माण झालेले आहे. गावपातळीवर जवळपास 40 हजार प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्ती कार्य करत आहेत.

प्रत्येक गावाला दर्जेदार रस्ता

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ग्रामीण भागात जवळपास २ लाख ३६ हजार रस्ते आहेत. या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यापुढील काळात प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता दर्जेदार असावा, ही आमची प्राथमिकता असेल. प्राथमिक शाळा तसेच आरोग्य केंद्रे यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यावरही भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.    

सरपंचांच्या थेट निवडीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सरपंचांच्या थेट निवडीमुळे त्याचा विपरीत परिणाम दिसून आला आहे. सरपंच एका विचाराचे व सदस्य दुसऱ्या विचाराचे असे चित्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झाले आहे. थेट निवडून आलेले सरपंच व सदस्य यांच्यामध्ये समन्वय राहिलेला नाही. याचा गावाच्या विकास कामावर परिणाम झाला आहे. आपल्या देशात अध्यक्षीय पद्धती नाही, तर मग गावात थेट सरपंच निवडीची पद्धती का ? असा प्रश्न मी उपस्थित केला होता, असे ते म्हणाले. त्यामुळे सरपंचांची थेट निवडीची पद्धती रद्द करुन सदस्यांमधून सरपंच निवडीच्या पद्धतीचे त्यांनी समर्थन केले.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, मुख्य परिचालन अधिकारी रवींद्र शिंदे उपस्थित होते.
००००
इर्शाद बागवान/विसंअ/दि.14.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.