'जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या 'बालकांचे हक्क व सुरक्षितता' या विषयावर मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'बालकांचे हक्क व सुरक्षितता' या विषयावर युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्रे बालनिधीचे राज्य सल्लागार विकास सावंत यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होईल. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीमध्ये  शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी तसेच  महिला व बाल अपराध प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्या प्रतिक्रियांचा समावेश आहे.
     
युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनिधीच्या वतीने  १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने ही मुलाखत घेण्यात आली आहे. बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह, बालहक्क कायदा, कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकांसाठी युनिसेफ करत असलेली कामे, शिक्षणाच्या मूलभत हक्काची अंमलबजावणी होण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, बालकांना सर्व प्रकारच्या गैरवर्तनापासून संरक्षण कसे मिळेल, बालगुन्हेगारी रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, ग्रामीण भागातील बालकांच्या समस्या आणि त्या दूर करण्यासाठी  करावी लागणारी जनजागृती याविषयी सविस्तर माहिती श्री. सावंत यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.