मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी नेटवर्क जॅमर्सची आवश्यकता नाही-मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 23 : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ही स्वतंत्र (स्टँड अलोन) यंत्रे आहेत. कोणतेही रेडिओ तरंग ग्रहण अथवा प्रसारित (ट्रान्समिट) करण्याची त्यांची क्षमता नाही. ही यंत्रे कोणत्याही वायरलेस, वायर, इंटरनेट, वायफाय किंवा अन्य कोणत्याही बाह्य यंत्रणेशी जोडली किंवा त्याद्वारे नियंत्रित केली जाऊ  शकत नाहीत. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी जॅमर्स लावण्याची आवश्यकता नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
        
मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी 'नेटवर्क जॅमर्स' लावण्याच्या तसेच अन्य मुद्द्यांबाबत काँग्रेस पक्षाच्या मागणीच्या अनुषंगाने हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात पुढे माहिती देण्यात आली आहे की, मतमोजणी फेरीनिहाय केली जाते. त्या फेरीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच पुढील फेरीच्या मतमोजणीच्या ईव्हीएम मतमोजणी केंद्रात आणल्या जातात.
        
व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची ईव्हीएममधील मतांशी पडताळणीसाठी निवडावयाची मतदान केंद्रे चिठ्ठी टाकून निवडली जातात. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. यासाठीच्या मतदान केंद्रांची निवड ही उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत केली जाते.
        
फेरमतमोजणीबाबतची तरतूद 'निवडणूक संचालन नियम, 1961' च्या 'नियम 56-डी' नुसार निर्धारित केलेली आहे. त्यानुसार आवश्यकतेप्रमाणे कार्यवाही केली जाते.
        
सर्वोच्च न्यायालयाने चंद्राबाबू नायडू आणि अन्य विरुद्ध भारत सरकार आणि अन्य या रिट याचिका क्र. 273/2019 मध्ये दि. 8 एप्रिल 2019 च्या निकालातील निर्देशानुसार प्रत्येक मतदारसंघात 5 व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी केली जाते, असेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.