कुंथुगिरी तीर्थक्षेत्राचा एकात्मिक विकास आराखडा शासनाकडे सादर करण्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 10 : पर्यटन व धार्मिक पार्श्वभूमीचा संगम असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री कुंथुगिरी-आळते या तीर्थक्षेत्राचा एकात्मिक विकास आराखडा तयार करुन शासनाच्या मान्यतेसाठी तात्काळ सादर करावा, असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.
        

जैन धर्मियांचे धार्मिक स्थळ असलेले श्री कुंथुगिरी क्षेत्राच्या वाढीव विकास आराखड्याच्या अनुषंगाने श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात करण्यात आले होते.
        

गणाधिकारी गणाधराचार्य श्री 108 कुंथुसागर महाराज यांनी सन 2001 मध्ये कोल्हापूर शहराच्या पूर्वेला 25 कि.मी. अंतरावरील आळते (ता. हातकणंगले) येथील रामलिंग डोंगरालगत कुंथुगिरी क्षेत्राची स्थापना केली. येथे भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. पार्श्वनाथ मंदिर, गुरू मंदिर, आगम मंदिर, शांतीनाथ मंदिर, समाधी ध्यान मंदिर आदी सुंदर मंदिरे बांधण्यात आलेली आहेत. तसेच येथे देशातील विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करुन संशोधन करण्याचे काम केले जाते. या ठिकाणी आगामी काळात सम्मेद शिखरजी यांची प्रतिकृती बसविण्यात येणार असून वृद्ध भाविकांसाठी आश्रम, शैक्षणिक संकुल, प्रशस्त रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या धर्मस्थळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
        

श्री क्षेत्र कुंथुगिरी च्या विकासासाठी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासह आवश्यक विकास कामांचा वाढीव आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीस ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी अभिजित तेळणेकर, कोल्हापूरच्या सहायक जिल्हा नियोजन अधिकारी प्राजक्ता साळुंखे, श्री क्षेत्र कुंथुगिरी चे शीतल बुरसे, धनंजर हारे, अमित गाठ आदी उपस्थित होते.
००००
सचिन गाढवे/विसंअ/दि.10 जुलै 2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा