शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांना सर्व सोयीसुविधा देणार - आदिवासी विकासमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके

1 टिप्पणी





जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्याशी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

मुंबई, दि. 24 : आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांना रस्ते, वीज, पाणी, शौचालय व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करुन देणार असून याबाबतची पाहणी राज्यस्तरीय पथकामार्फत लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी दिली.
          

जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्याशी आदिवासी उपाययोजनेंतर्गत विविध योजनांचे नियोजन व अंमलबजावणीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत डॉ.उईके बोलत होते. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला अनुसूचित क्षेत्रातील 16 आदिवासी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. 


डॉ.उईके म्हणाले, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह दुरुस्तीच्या कामांना 31 जुलैपर्यंत मान्यता देऊन ती कामे 15 दिवसात सुरु करावी. सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नाही, त्यांना 15 दिवसांच्या आत शिष्यवृत्ती देण्यात यावी व त्याचा अहवाल त्वरित सादर करावा. सर्व शासकीय, अनुदानित व नामांकित शाळांची तपासणी जिल्ह्यातील महिला अधिकाऱ्यांमार्फत त्वरित करण्यात यावी.


मुलींच्या निवासी आश्रमशाळांमध्ये निवासी महिला अधीक्षकांनी आश्रमशाळेतच मुक्कामी राहावे. ज्या महिला अधीक्षक मुक्कामी राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. वीजपुरवठा न झालेल्या आश्रमशाळा तसेच आदिवासी बहुल गावे/वाड्या/पाडे यांना त्वरित वीजपुरवठा करण्यात यावा. रस्ते विकासाच्या निधीचे नियोजन त्वरित करुन रस्त्याने न जोडलेल्या आश्रमशाळा/पाडे/वाड्या यांना प्राधान्य क्रमाने जोड रस्ते देण्याबाबतची मान्यता 15 दिवसात देण्यात यावी. अनेक आश्रमशाळांना बारमाही पाणीपुरवठा उपलब्ध नाही त्या सर्व शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रमशाळांना बारमाही पाणीपुरवठा होईल याबाबतचे त्वरित नियोजन करण्याचे निर्देश डॉ.उईके यांनी दिले.

1 टिप्पणी

  1. सर हे फक्त कागदोपत्री होते असे मला वाटते मी एवढा मोठा नाही की काही कुठे तक्रार करू शकेल पण मी एक शासकीय आश्रम शाळेतच वोकेशनल ट्रेनर आहे इथे मुलांना रोज चांगले जेवण मिळत नाही म्हणजे पौष्टिक आहार वगैरे फक्त आदिवासी च्या जाहिराती मध्ये दिसून येते आणि शाळेतील १२वी पर्यंत च्या ४०-५०% विद्यार्थ्यांना मराठी सुद्धा वाचता येत नाही या कडे कोणी अधिकारी का लक्ष देत नाहीत??

    उत्तर द्याहटवा