‘हाफकिन’ ला जगभरात लस व औषधपुरवठा करणारी प्रमुख संस्था बनविणार - अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 12 : हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला देशातीलच नव्हे तर आशिया, आफ्रिका आणि इतर खंडात लसींचा तसेच विविध प्रकारच्या औषधांचा पुरवठा करणारी एक प्रमुख संस्था बनविले जाईल. यासाठी संस्थेला सर्व प्रकारची प्रशासकीय आणि आर्थिक मदत केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.


श्री. रावल यांनी परळ येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला भेट देऊन महामंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महामंडळाने विविध ९ प्रकारच्या औषधगोळ्या तयार करण्याचा हाती घेतलेला प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे, असे मंत्री श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.


हाफकिनही भारतासह आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांना पोलिओ लसींचा पुरवठा करणारी प्रमुख संस्था आहे. याशिवाय येथे सर्पदंश, विंचुदंश, घटसर्प, धनुर्वात आदी लसींचीही निर्मिती केली जाते. देशातील सर्व राज्यांना, तसेच आशिया, आफ्रिकेसह जगभरातील इतर खंडातील देशांना लसींचा पुरवठा करणारी प्रमुख संस्था म्हणून हाफकिनने पुढे आले पाहिजे. लसींचा आणि विविध औषधांचा पुरवठा करणारी प्रमुख संस्था म्हणून हाफकिनने जगभरात नावलौकिक मिळवावा. यासाठी शासनामार्फत मनुष्यबळ, प्रशासकीय मान्यता, आर्थिक निधी आदी सर्व बाबींची उपलब्धता करुन दिली जाईल, अशी ग्वाही मंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिली.


हाफकिनमध्ये आता औषधगोळ्यांचीही निर्मिती
लोकांना किफायतशीर दरात औषधगोळ्या मिळाव्यात यासाठी टॅब्लेट्स ॲण्ड कॅप्सुल निर्मितीचा नवीन विभाग हाफकिनमध्ये सुरु करण्यात येत आहे. श्री. रावल यांनी यावेळी या विभागाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून किरकोळ बाबींसाठी प्रकल्प रखडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बाबींची पूर्तता करुन हा प्रकल्प सुरु करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


राज्यात श्वानदंशाचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे महामंडळाने हाती घेतलेल्या टिश्यू कल्चर तंत्रज्ञानावर आधारित जास्त सुरक्षित आणि गुणवत्ताधारक रेबीज लस उत्पादनाच्या प्रकल्पास आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे श्री. रावल यांनी यावेळी सांगितले. महामंडळामार्फत सर्पविषाचे मानकीकरण करण्याचे देश पातळीवरील केंद्र उभारण्यात येत आहे. यासाठी २३ कोटी १८ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. याशिवाय विष संशोधन केंद्र सुरु करण्याची मागणी महामंडळाने केली आहे. या सर्व प्रकल्पांसाठी राज्य शासनामार्फत सहकार्य करण्याबरोबरच केंद्र शासनाकडे आपण पाठपुरावा करु, अशी ग्वाही मंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिली.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख, महाव्यवस्थापक सुभाष शंकरवार यांच्यासह महामंडळातील विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा