लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार - सुधीर मुनगंटीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 16 : आपल्या साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी शासन साजरी करत आहे. या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


आज श्री. मुनगंटीवार यांनी विशेष सहाय्य योजनांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाप्रित्यर्थ  राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला असल्याची माहिती देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विशेष सहाय्य अंतर्गत येणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांमधील लाभार्थींना दर दोन महिन्यांनी नियमित अनुदान मिळेल अशी व्यवस्था विभागाने तात्काळ करावी, अनुदानापासून गरीब जनतेस, निराधार जनतेस वंचित ठेवू नये.


विशेष सहाय्य योजनांचे लाभार्थी, त्यांची नावे आणि याद्या या सगळ्या बाबी संगणकीकृत कराव्यात अशा सूचनाही मंत्रीमहोदयांनी यावेळी दिल्या. लाभार्थीचे बँक खाते आधारलिंक केल्यास डुप्लिकेशन टाळता येईल, त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींची खाती आधारलिंक करण्यास गती द्यावी असेही ते म्हणाले. विशेष सहाय्य योजनांच्या काही लाभार्थींचे खाते  हे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेत आहे. त्यांचीही एकदा बैठक आयोजित करण्यात यावी अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.


योजनांचे लाभ देताना जिल्हाधिकारी आणि मंत्रालय यामधली यंत्रणा म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट निर्माण केल्यास विशेष सहाय्य योजनांचे लाभ लाभार्थींना सुरळितपणे देणे शक्य होईल. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करणार असल्याचे श्री. वाघमारे यांनी यावेळी सांगितले. महाडीबीटी पोर्टलवरून विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थींना अनुदान वितरित करण्याबाबत विभाग काम करत असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.


विभागाच्या वतीने आज श्री. मुनगंटीवार यांच्यासमोर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. योजनांची माहिती, लाभार्थींची संख्या आणि अनुदानाचे स्वरूप यावर त्यात माहिती होती.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा