मनरेगा योजनेला अधिक गती देऊन रोजगार निर्मितीवर भर द्यावा - डॉ. नीलम गोऱ्हे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 1 : राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला अधिक गती देऊन मजुरांनी कामाच्या मागणी केल्या नंतर किमान आठ दिवसात  मजुराला रोजगार उपलब्ध कसा होईल यावर  विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या.

आज विधानभवनात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची आढावा बैठक  उपसभापती डॉ.गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर,सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.

मजुरांच्या हाताला काम मिळाले पाहिजे त्यासाठी या योजनेत स्थानिक अधिकाधिक कामाचा समावेश करावा आणि मजुरांना अधिक रोजगार उपलब्ध करून द्यावा. रोजगार हमी बजेट 15 ऑगस्टला मांडावे त्यानंतर रोहयोचा आढावा द्यावा. मजुरांना कामाची माहिती मिळावी यासाठी एसएमएस सिस्टीम  किंवा ऑनलाईन सिस्टीम सुद्धा विकसित करावी, अशा सूचनाही श्रीमती डॉ.गोऱ्हे यांनी केल्या.

रोहयोमंत्री श्री. क्षीरसागर म्हणाले, रोजगार हमी योजना ही राज्यातून सुरू झाली आणि ती देशानी स्वीकारली आहे. त्यासाठी या योजनेला बळकट करण्यासाठी आणि मजुरांना रोजगार मिळावा यासाठी स्थनिक मजुरांच्या अडचणींचा अभ्यास करून त्यात बदल करण्यात येईल, असेही श्री.क्षीरसागर यांनी संगितले.

या बैठकीत मजुरांच्या रोजंदारीत वाढ, आठ दिवसात मजुरांना मंजुरी द्यावी, गायरान जमिनीवर झाडे लावण्यात मजुरांना काम द्यावे, या मजुरांना माफक दरात धान्य द्यावे आणि यात ज्वारीचा समावेश करावा, मनरेगामधील मजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी ग्राम पंचायत, तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त, राज्यस्तरीय सेल तयार करता येईल का या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा