विधानसभा लक्षवेधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतपीक विमा : बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

मुंबई, दि. 1 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम विमा कंपनीकडे न भरता अनियमितता केल्याच्या प्रकरणात बोबडे टाकळी (ता. परभणी) येथील संग्राम कक्ष संगणक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात बाधित शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणे पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज विधानसभेत सांगितले.


परभणी तालुक्यातील पीक विम्याच्या अनुषंगाने सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सदस्य श्री. अजित पवार यांनीही सहभाग घेतला. बोबडे टाकळी येथील शेतकऱ्यांनी 2018-19 च्या खरीप व  रबी हंगामासाठी  प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तेथील ग्रामपंचायतमधील संग्राम कक्षाच्या संगणक चालकाकडे विम्याची रक्कम आणि अर्ज भरला होता. त्यापैकी काहींना पोहोच पावत्या दिल्या होत्या आणि काहींना नंतर देण्यात येईल असे  सांगण्यात आले होते. तथापि, संबंधित संगणक चालकाने शेतकऱ्यांना बनावट पावत्या दिल्याचे आढळून आले असून या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. महिनाभरात या  प्रकरणात पोलीस  चौकशी पूर्ण करण्यात येईल, असेही श्री. खोत यांनी यावेळी  सांगितले.


पीक विम्याच्या अनुषंगाने तक्रार निवारण तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तालुका स्तरावर सुविधा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हा व तालुका स्तरावर उपस्थित राहण्याबाबत निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना अधिक नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीकोनातून पीक विम्याचा जोखीम स्तर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. खोत म्हणाले.
००००


पन्नास टक्क्याहून अधिक आदिवासी लोकसंख्येच्या गावांचा पेसामध्ये समावेश करण्यासाठी जलद कार्यवाही करणार - अशोक उईके

मुंबई, दि. 1 : पन्नास टक्क्याहून अधिक आदिवासी लोकसंख्या असलेल्या व आदिवासी उपयोजना क्षेत्रास भौगोलिकदृष्ट्या संलग्न असलेल्या गावांचा समावेश पेसाकायद्यांतर्गत करण्याच्या अनुषंगाने जलद गतीने कार्यवाही करण्यात येईल, असे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी सांगितले.


पेसा अंतर्गत समावेश न झालेल्या साक्री (जि. धुळे) तालुक्यातील गावांचा पेसामध्ये समावेश करण्याची मागणी सदस्य श्री. डी. एस. अहिरे यांनी लक्षवेधी सूचनेनुसार केली. त्याला उत्तर देताना श्री.उईके बोलत होते. या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सदस्य अजित पवार यांनीही सहभाग घेतला.

श्री. उईके यांनी सभागृहाला माहिती दिली की, साक्री तालुक्यातील पेसा कायद्यांतर्गत समावेश करण्याची  मागणी करण्यात आलेल्या 101 गावांपैकी 42 गावे जनगणना 2011 च्या यादीत आढळून आली नाहीत. त्यामुळे ही गावे पेसामध्ये समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव करता आलेला नाही. या गावांना सेन्सस कोड मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. उर्वरित पैकी 1 गाव सध्या अनुसूचित क्षेत्रामध्ये समाविष्ट असून 58 गावांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त आहे. त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करुन केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. राज्यपालांकडे पाठविण्यात आलेल्या गावांचा पेसामध्ये समाविष्ट करण्याबाबतचे आदिवासी सल्लागार समितीचे प्रस्ताव लवकरात लवकर निर्णय होण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

००००


कळवा खाडीवरील रेल्वे उड्डाणपुलाला
जोडपूल बांधण्याची शक्यता तपासून पाहणार - योगेश सागर

मुंबई, दि. 1 : ठाणे-बेलापूर महामार्गावर कळवा खाडीवरील काम सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाला शाखापूल (आर्मब्रीज) बांधण्याबाबतची व्यवहार्यता तपासून पाहण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधानसभेत सांगितले.

ठाणे- बेलापूर महामार्गावरील विटावा रेल्वे पुलाखालील बोगद्यात पाणी साचत असल्याने आणि एक बोगदा दुरुस्तीसाठी बंद ठेवल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सदस्य श्री. जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यास उत्तर देताना श्री. सागर बोलत होते.

वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यातसाठी सध्या काम सुरू असलेल्या पुलाची लांबी वाढविण्याच्या मागणीवर बोलताना श्री. सागर यांनी यावेळी माहिती दिली की, विटावा रेल्वेपुलाखालील बोगद्याची पातळी लगतच्या खाडीच्या भरतीप्रसंगीच्या पाणीपातळीपेक्षा कमी असल्याने बोगद्यामध्ये पाणी येते ही वस्तुस्थिती आहे. हे पाणी काढण्यासाठी तेथे पंप बसविण्यात आलेले आहेत. पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा येतो. कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक असल्यामुळे 2010 मध्ये बंद करण्यात आला आहे. सध्या 1995-96 मध्ये बांधलेल्या पुलावरुन वाहतूक सुरू आहे.

ठाणे महानगरपालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक अतिरिक्त पूल बांधण्याचे नियोजन 2012-13 मध्ये केले. त्याचे 65 टक्के काम झाले आहे. पुलाची वाढणारी लांबी आणि खर्च तसेच मुख्य रेल्वे लाईनवर काम करण्यासाठी मिळणारा मर्यादित वेळ पाहता या पुलाचे संकल्पन (डिझाईन) रेल्वे लाईन खालील मार्गापासून 360 मीटर आधी संपते अशा लांबीचे करण्यात आले. या पुलाच्या उतरणीच्या 405 मी. लांबीपैकी 260 मीटर लांबीचे काम झाले आहे. त्यामुळे या पुलाची लांबी वाढविणे शक्य नाही. मात्र त्यास एखादा शाखापूल (आर्मब्रीज) बांधता येण्याच्या शक्यतेची व्यवहार्यता तपासण्यात येईल व तसे  शक्य  असल्यास पुढील निर्णय घेण्यात येईलअसेही श्री. सागर म्हणाले.

००००

वसतिगृहातील आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी
चार कर्मचाऱ्यांना अटक; संस्थाचालकांवर लवकरच कारवाई - दीपक केसरकर

मुंबई, दि. 1 : राजूरा (जि. चंद्रपूर) येथील शाळेच्या वसतिगृहातील आदिवासी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात वसतिगृहाचे अधीक्षक, सहायक अधीक्षक, वॉर्डन आणि सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली असून संस्थाचालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे, असे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत सांगितले.

राजूरा (जि. चंद्रपूर) येथील इन्फन्ट पब्लिक जिजस स्कूलच्या वसतिगृहातील आदिवासी मुलींचे लैंगिक  शोषण झाल्याच्या प्रकरणाबाबत उपस्थित लक्षवेधी चर्चेला उत्तर देताना श्री. केसरकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या शाळेच्या संस्थाचालकांनी न्यायालयात जाऊन अटकपूर्व जामीन  मागितला आहे. न्यायालयाने त्यांना 8 जुलैपर्यंत अटक करु नये तसेच अटकेपूर्वी 72 तासाची नोटीस देण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 72 तासांची  नोटीस देण्यात आली असून 8 जुलैनंतर तात्काळ संस्थाचालकांवरही कारवाई करण्यात येईल. या पीडित मुलींना मनोधैर्य योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे, असेही श्री. केसरकर यांनी  सांगितले.

या चर्चेत सदस्य सर्वश्री  वैभव पिचड आणि  सुनील  केदार  यांनी  सहभाग घेतला.
0000

अतिरिक्त पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सकारात्मक - गिरीष महाजन

मुंबई, दि. 1 : अतिरिक्त पाणी असलेल्या खोऱ्याचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने नदीजोडसारखी योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत सांगितले.


अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व नगर तालुक्यातील साखळाई उपसा सिंचन योजनेच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री राहुल जगताप, अजित पवार आणि शरद सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. श्री. महाजन म्हणाले, साखळाई उपसा सिंचन योजनेमध्ये कुकडी प्रकल्पाचे 3 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर तलावात सोडण्याचे व तेथून ते उपसा सिंचन योजना राबविण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, सन 2000 मध्ये पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेशन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी तयार केलेल्या पाणी उपलब्धता अहवालात या योजनेसाठी पाणी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच कृष्णा पाणीवाटप लवादाच्या निर्णयानुसार राज्याला अनुज्ञेय असलेल्या पाणी वापराच्या नियोजनात या योजनेचा अंतर्भाव नसल्याने योजनेबाबतची पुढील कार्यवाही झाली नाही.


कुकडी  प्रकल्पातील मूळ नियोजनातील बॅकवॉटरमधील गावांनाही अद्याप सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट साध्य करावयाचे  आहे. तसेच दुसरा कृष्णा पाणी वाटप लवादाकडे राज्याला अतिरिक्त  पाणी वाटप होण्याची मागणी असून ती मान्य झाल्यास जादाचे पाणी असलेल्या डिंभे प्रकल्पाचे पाणी  तुटीच्या खोऱ्यात वळवणे शक्य होईल. त्यानुसार डिंभे- माणिकडोह बोगदा करण्याबाबत विचार सुरू असून त्यानंतर या उपसा सिंचन योजनेसाठी 3 टीएमसी पाणी उपलब्ध करुन देणे शक्य  होईल. नवीन प्रकल्पांचे सिंचनाचे पाणी मोठ्या बंद पाईपलाईनने देण्याचे शासनाचे धोरण आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या कालव्यांची गळती बंद करण्यासाठी दुरुस्तीवरही निधी देण्यात  येईल, असेही ते म्हणाले.
0000

अरुणा प्रकल्पाचे काम गतीने सुरू - गिरीष महाजन

मुंबई, दि. 1 : प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये समाविष्ट केल्यामुळे वैभववाडी (ता. सिंधुदुर्ग) येथील अरुणा पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला गती आली असून यावर्षी 48 द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे. या धरणाचे काम लवकरच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली.


सदस्य सर्वश्री वैभव नाईक, सत्यजीत पाटील- सरुडकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की, 2005 मध्ये मान्यता दिलेला हा प्रकल्प विविध कारणांनी रखडला होता. त्याला 2015 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समाविष्ट केल्यामुळे कामाला गती मिळाली. यावर्षी प्रकल्पाची घळभरणी करण्यात आली असली असून विक्रमी 45 लक्ष घनमीटर मातीकाम  करण्यात  आले आहे. सांडव्याचे काम 40 टक्के इतके पूर्ण करण्यात आले आहे.


एका मुद्द्याला उत्तर देताना श्री. महाजन म्हणाले  की, बांधकामाची गुणवत्ता नियमानुसार नियमितपणे तपासण्‍यात येत असून काम सर्व मानकांनुसार सुरू आहे. तसेच प्रकल्पाची भाववाढ ही प्रकल्पाला लागलेल्या विलंबामुळे आणि दरसूचित झालेल्या वाढीमुळे  झाली आहे.


या प्रकल्पामुळे 244 घरे बाधित झाली होती. त्यांना नुकसान भरपाई देण्यात आली  असून  स्थलांतराचे  कामही पूर्ण होत आहे.
0000शालेय विद्यार्थ्यांमधील व्यसनाबाबत शासन गंभीर - जयकुमार रावल
मुंबई दि. 1 : शालेय विद्यार्थ्यांमधील व्यसनांविषयी शासन गंभीर असून राज्यातील 16 हजार शाळांना तंबाखूमुक्त  करण्यात  आले आहे, अशी  माहिती अन्न व औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल  यांनी  दिली.

राज्यातील विद्यालये व महाविद्यालयांच्या परिसरात उघड्यावरील खाद्यपदार्थांची विक्री व व्यसनांच्या अनुषंगाने सदस्य कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. सिगरेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थांविषयीच्या कोटपा कायद्याची गृह विभाग तसेच महानगरपालिकांच्या समन्वयातून अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात या कायद्यांतर्गत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाची  स्थापना करण्यात आली आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थांनाही समाविष्ट करुन घेण्यात येईल. शाळांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ तसेच नशेच्या पदार्थांची विक्री याबाबत कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात  येत आहे.

या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रशांत ठाकूर, अजित पवार, श्रीमती दिपीका चौधरी यांनीही सहभाग घेतला.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा