मिरजेच्या शासकीय संस्थेत दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 11 : दिव्यांगांच्या कल्याणासाठी मोफत व्यवसाय व संगणक प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था मिरज येथे आहे. या संस्थेत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरू आहे.  तरी इच्छुकांनी प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा व प्रवेश अर्ज संस्थेकडे 31 जुलै 2019 पूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी आपणास ज्ञात असलेल्या गरजू दिव्यांग बांधवांना या शासकीय योजनेची माहिती द्यावी, असे आवाहन मिरज येथील शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाच्या अधीक्षकांनी केले आहे.


प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधीक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, ता. मिरज, जि. सांगली, पिनकोड-416410 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा समक्ष मोफत मिळतील. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, अपंगत्व असल्याबाबतचे समक्ष अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे.


या संस्थेतील प्रशिक्षण वर्गांना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबईची शासन मान्यता आहे. प्रवेशासाठी अभ्यासक्रमाचे नाव, नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत. सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस. ऑफिस (संगणक कोर्स) साठी इयत्ता 8 वी पास व मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स) साठी इयत्ता 9 वी पास अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. एम.एस.सी.आय.टी (संगणक कोर्स). वयोमर्यादा 16 ते 40 वर्षे, प्रशिक्षण कालावधी 1 वर्षे.


या संस्थेत फक्त दिव्यांगांनाच प्रवेश दिला जातो. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय आहे. अद्ययावत व परिपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रात्यक्षिक व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्किंग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना अशा सोयी व सवलती आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा