आंबेडकरी चळवळीतील मार्गदर्शक नेता काळाच्या पडद्याआड - सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई दि. 16 : लेखक, विचारवंत आणि ज्येष्ठ नेते राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते व एक मार्गदर्शक नेते काळाच्या पडद्याआड गेले आहेत. दलित पॅंथरच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. श्री. ढाले यांच्या निधनाने दलित चळवळ, बौद्ध साहित्यविश्व, आणि आंबेडकरी विचार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे. 
०००००

बौद्धिक पातळीवरच्या लढ्याची प्रेरणा देणारा नायक
- सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर

मुंबई, दि. 16 : राजा ढाले यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे धक्का बसला आहे. त्यांचे वयोमान  झाले होते, तरीही त्यांना कुठलीही व्याधी नव्हती. एकाएकीच त्यांनी आपला प्रवास संपवला. बौद्धिक पातळीवरच्या लढ्याची प्रेरणा देणारा असा नायक होता. आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात राजा ढाले हे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.


राजा ढाले चांगले कवी, वाचक, संपादक, लेखक होते. त्यांची स्मृती शेवटपर्यंत टिकून होती. पुस्तकाचा त्यांचा मोठा संग्रह होता. तर्कशास्त्रावर त्यांची मोठी पकड होती. एखाद्या गोष्टीचा तर्कवाद करताना समोरच्याला ते निष्प्रभ करत.          

राजा ढाले यांनी दलित चळवळीला बौद्धिक पातळीवरच्या संघर्षाची प्रेरणा दिली. लोकांच्या प्रश्नावर लढाई करणारा हा माणूस होता. दलित पँथर किंवा त्यांनी स्थापन केलेल्या मास मूव्हमेंट संघटनांचा पुढे कित्येक वर्षे कार्यकर्त्यांवर मोठा प्रभाव राहिला. या पार्श्वभूमीवर राजा ढाले यांचे अकाली जाणे चटका लावणारे आहे, असेही श्री. महातेकर यांनी म्हटले आहे.
०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा