विधानपरिषद लक्षवेधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतपुणे विद्यापीठातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव - रवींद्र वायकर

मुंबई, दि. १ : पुणे विद्यापीठातील पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के व इतर विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. ह्या राखीव जागा यापुढे कायम राहणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
   

विधानपरिषद सदस्य आर्कि. अनंत गाडगीळ यांनी पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के राखीव जागा (कोटा) संदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री. वायकर बोलत होते. विद्यार्थी व जनभावना विचारात घेऊन पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वीप्रमाणे ७० टक्के कोटा कायम ठेवण्यात आलेला असल्याचे श्री. वायकर यांनी सांगितले.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. सदर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शासनाने विहित केलेले नियम, मागासवर्गीय प्रवर्गासाठी वेळोवेळी विहित केलेले आरक्षण या बाबी विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २००२-०३ पासून विद्यापीठ अध्यादेश लागू केला होता. त्यामधील काही तरतुदींमध्ये सुधारणा करून शैक्षणिक वर्ष २०१३-१४पासून सुधारित अध्यादेश लागू करण्यात आला. त्यानुसार पुणे विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के व इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के कोटा विहित करण्यात आलेला होता. हा अध्यादेश कायम ठेवण्यात आला आहे. 
००००


वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी योग्य ती सर्व खबरदारी - मदन येरावार

मुंबई, दि. १ : नाशिक शहारातील वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी ऊर्जा विभागाने सर्व खबरदारी घेतली आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वीची निगा व दुरुस्तीची कामे महावितरण कंपनीमार्फत एप्रिल व मे २०१९ मध्ये करण्यात आली असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी नाशिक शहरातील वीजपुरवठ्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. येरावार बोलत होते. नाशिक शहरात आठ व नऊ जून रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यानंतर शहरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र त्यानंतर ऊर्जा विभागाच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे श्री. येरावार यांनी सांगितले.
00000


राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांच्या
उन्नतीसाठी शासन कटिबद्ध - चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 1 : आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अल्पसंख्याकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी  शासन कटिबद्ध असून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजातील सर्व घटकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी आवश्यक त्या सोयी सवलती देण्यात येतील, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.


सदस्य विनायक मेटे यांनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.


श्री. पाटील म्हणाले, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुस्लिम समाजातील तरुणांसाठी शैक्षणिक कर्ज योजना, सूक्ष्म पतपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी शासनाने आतापर्यंत महामंडळास रु.450.69 कोटी एवढे भाग भांडवल टप्प्याटप्याने वितरित केले आहे. सन 2019-20 साठी या महामंडळातील रु.25 कोटी एवढे भाग भांडवल अर्थसंकल्पित करण्यात आलेले आहे.
        

महामंडळामार्फत आतापर्यंत एकूण 75 हजार 515 लाभार्थ्यांना रु.391.8203 कोटी एवढे कर्ज वितरीत केले आहे. तसेच केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार विभागाच्यावतीने देशातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप दिली जाते.

राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असणाऱ्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना या तीन योजना राबविण्यात येतात. त्यापैकी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना या दोन योजनांतर्गत कर्ज बँकामार्फत मंजूर करण्यात येत असून गट प्रकल्प कर्ज योजनेंतर्गत, नॉन क्रिमिलेअर करिता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत असलेल्या उमेदवारांना, पात्र शेतकरी उत्पादक गटांना रुपये 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज रक्कम उद्योगाकरिता महामंडळामार्फत देण्यात येते. सदर योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक गटांना रक्कम रु.59.50 लाख प्रदान करण्यात आलेली आहे. या तीनही योजना पूर्णपणे संगणकीकृत असून या योजना संपूर्णत: पारदर्शक आहेत.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा