विधानपरिषद लक्षवेधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


वेसावा मच्छिमार संस्थेचा डिझेलवरील प्रतिपूर्ती परतावा लवकरच- मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर

मुंबई, दि.२६ : वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड या संस्थेचा थकित डिझेलवरील प्रतिपूर्ती परतावा हा विभागाची १४३ कोटीची पुरवणी मागणी मान्य झाल्यावर लगेचच देण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या थकित डिझेलवरील प्रतिपूर्ती परतावाबाबतची लक्षवेधी सूचना ॲड.अनिल परब यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना श्री.जानकर बोलत होते.

श्री.जानकर म्हणाले, केंद्र सरकारकडे मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याबाबतचा पाठपुरावा सुरु असून हा दर्जा मिळाल्यानंतर मत्स्यव्यवसायाला कृषी योजनेचे सर्व लाभ मिळतील. डिझेल तेलावरील विक्रीकराची प्रतिपूर्तीची सर्व सागरी जिल्ह्यांना वितरीत केलेली संपर्ण रक्कम संबंधित नौका मालकांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा करण्याबाबत सातही सागरी जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय तसेच प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, मुंबई यांना कळविण्यात आलेले असून त्याप्रमाणे सर्व जिल्हा कार्यालयांना निधी वितरीत करण्यात येत आहे.

या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

००००

अर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांना प्रलंबित नागरी 
सोयी-सुविधा लवकरच- राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे

राजापूर तालुका (जि.रत्नागिरी ) अर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या अपुऱ्या व प्रलंबित नागरी सोयी-सुविधा लवकरच देऊ व त्या भागाला प्रत्यक्ष भेट देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

राजापूर तालुका (जि.रत्नागिरी ) अर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांच्या अपुऱ्या व प्रलंबित नागरी सोयी-सुविधा याबाबतची लक्षवेधी सूचना ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना श्री.भेगडे बोलत होते.

श्री. भेगडे म्हणाले, अर्जुना मध्यम प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार नादुरुस्त नागरी सुविधांच्या दुरुस्तीच्या कामांना निविदा प्रक्रिया पूर्ण करुन दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून ८० टक्के दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. संपूर्ण दुरुस्ती झाल्यावर विहित नागरी सुविधांसह पुनर्वसित गावठाणाचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्यात येईल. तसेच प्रकल्पग्रस्तांनाच जर जागा दिली नसेल तर याबाबत चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करु.

या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले, अनिल परब, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

000

कोकणातील धरणांच्या कामांबाबत लवकरच सर्वंकष
 धोरण ठरवू- जलसंधारणमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

कोकणातील प्रलंबित धरणे व अन्य धरणांच्या कामांबाबत तेथील लोकप्रतिनिधींची आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वंकष असे धोरण ठरविणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत यांनी आज विधानपरिषदेत दिली.

वागदे ता.कणकवली जि. सिंधुदूर्ग येथील लघुपाटबंधारे धरण प्रकल्पाच्या प्रलंबित कामाबातची लक्षवेधी सूचना सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना डॉ. सावंत बोलत होते.

डॉ. सावंत म्हणाले, राज्यात अपूर्ण धरणांची कामे पूर्ण करण्याबाबत ठरविलेल्या धोरणानुसार ८० टक्के अपूर्ण धरणाची प्रथम कामे त्यानंतर ५० टक्के अपूर्ण धरणाची कामे असा आकृतीबंद असून त्यानुसारच धरणांची कामे सुरु आहेत. कोकणात पावसाचे प्रमाण जास्त असून पाणी डविण्याचे प्रमाण कमी आहे. त्यासाठी कोकणातील प्रलंबित धरणे व अन्य धरणांच्या कामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वंकष असे धोरण ठरविले जाईल.

या चर्चेत सदस्य भाई गिरकर यांनी सहभाग घेतला.

०००० 

मोबाईल टॉवर व शीतगृहामुळे लागणाऱ्या आगीवर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार- राज्यमंत्री योगेश सागर

राज्यात मोबाईल टॉवर व शितगृहामुळे महानगरांमध्ये आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. या लागणाऱ्या आगीवर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची समिती लवकरच नेमणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानपरिषदेत दिली.

नागपूर शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होणे, अनधिकृत इमारत, अग्निशमन दल व मोबाईल टॉवरबाबत लक्षवेधी सूचना सदस्य गिरीष व्यास यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना श्री. सागर बोलत होते.

श्री. सागर म्हणाले, राज्यात आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, डिसेंबर, २००८ मध्ये लागू झाल्यानंतर, महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत उपरोक्त विविध आस्थापना तसेच इमारती यांची तपासणी करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

नागपूर शहर/नागपूर महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये माहे एप्रिल, २०१९ मध्ये ३०४ आणि मे, २०१९ मध्ये २७७ किरकोळ आगीच्या घटनांची नोंद झाल्याचे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने कळविले आहे. यामध्ये जीवितहानी झाली नाही. आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मधील तरतुदीनुसार रहिवासी, व्यावसायिक तथा विविध उपक्रमाच्या एकू३९३८ इमारतींना नागपूर अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागामार्फत प्रथम ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले असून, त्यापैकी ९१३ इमारतधारक/भोगवाटादार यांनी अग्निशमन विभागाचे अंतिम       ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे. मोबाईल टॉवरच्याबाबतही शासन योग्य ती उपाययोजना करेल.

या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले, नागोराव गाणार आदींनी सहभाग घेतला होता.

००००

शेतकऱ्यांच्या ऊसतोडणी यंत्राचे अनुदान 
देणार- सहकारमंत्री सुभाष देशमुख

राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीने मंजूर केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या ऊसतोडणी यंत्राचे अनुदान शासन देणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत दिली.

नांदेड जिल्ह्यासह राज्यातील काही शेतकऱ्यांना ऊसतोडणी यंत्राचे अनुदान मिळण्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना श्री.देशमुख बोलत होते.

श्री. देशमुख म्हणाले, केंद्र सरकारमार्फत सहकारी साखर कारखाने, व्यक्ती अथवा त्यांचा समुहगट, शेतकरी अथवा त्यांचा समुहगट व स्वयंसहाय्यतागट त्यांच्यासाठी ऊसतोडणी यंत्र खरेदी अनुदान योजना राबविली जाते. राज्यात आतापर्यत राज्यस्तरीय प्रकल्प समितीने मंजूर केलेल्या शेतकऱ्यांना ऊसतोडणी यंत्राचे अनुदान दिलेले आहे. र्वरित शेतकऱ्यांना प्रकल्प मंजूरी समितीच्या जुलै, २०१९ रोजी होणाऱ्या सभेत हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात येणार असून त्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

या चर्चेत सदस्य सर्वश्री रामहरी रुपनवर, सतीश चव्हाण, अनिल परब आदींनी सहभाग घेतला होता.

000

भूकंपापासून होणारी जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना- राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे

पालघर जिल्ह्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांपासून होणारी जीवित व वित्तहानी रोखण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या मोठ्या व मध्यम धक्क्याने सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरु नये यासाठी करावयाच्या उपायोजनांबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य आनंद ठाकूर यांनी मांडली होती, त्याला उत्तर देताना श्री.भेगडे बोलत होते.

श्री. भेगडे म्हणाले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत भूकंप सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय’ CSIR नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या दहा हजार प्रती भूकंप प्रवण क्षेत्रातील सर्व विद्यार्थी व घरोघरी वाटप करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तसेच स्थानिक जनतेच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या भितीचे वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम शालेय स्तरावरुन गावागावातील नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेला आहे, व यापूढेही राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवणार नाही यासाठी NDRF, Civil Defence मार्फत प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या अनुषंगाने शासन जनजागृती व प्रशिक्षणाबाबत अग्रक्रमाने कार्यवाही करत आहे. तसेच जिल्ह्यातील अणुऊर्जा प्रकल्पाला भूकंपरोधक बांधकाम केले असल्याची माहिती श्री. भेगडे यांनी दिली.

या चर्चेत सदस्य सर्वश्री रवींद्र फाटक, श्रीमती विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा